अनुभव १३५🌺
- Jayant Velankar
- Sep 24, 2020
- 4 min read
Updated: Oct 6, 2020
" श्री "
गजानन महाराज की जय
*संतांनी ज्या धरीले हाती*
जय गजानन! जो मदतरूप ठरला, तो देवरूप ठरला! आपल्याला योग्य वेळी योग्य पध्दतीने एखादी मदत पोहोचणे हा नियतीच्या खेळाचाच भाग असतो. माझ्या बाबतीत असं अनेक वेळा झालं आहे की, कुठे जंगलात अथवा अन्य अडनिड जागी गाडी बिघडल्यामुळे म्हणा अथवा अन्य कारणाने म्हणा, मला मदतीची गरज भासावी आणि कुणी तरी मदतरूप ठरावा. अर्थात याकरीता अगदी लहानपणापासून आईकडून चालत आलेली गजानन महाराजांची भक्ती नेहमीच मदतरूप ठरली आहे असा माझा दृढ विश्वास आहे.
मी लक्ष्मीकांत आमोणकर, गोवा. खरं सांगायचं तर आजचा हा अनुभव मी आणि माझी पत्नी सौ ललिता आम्हा दोघांचाही आहे ,असं म्हणता येईल. ललिताही अगदी लहानपणापासून गजानन विजय ग्रंथ वाचीत आली आहे. हा अनुभव दोघांचाही म्हणायचा तो अशासाठी की या प्रकरणात मी आठ दहा दिवस कोमात होतो. त्यामुळे त्याकाळात जे घडलं ते ललितानेच मला सांगितलं.
गोव्यातील ' डिचोली ' तालुक्यात ' आमोणा ' हे आमचं मूळ गाव. म्हणून आम्ही आमोणकर! अर्थातच या कारणाने गोव्याकडील भागात आमोणकर हे आडनाव खूप ठिकाणी तुम्हाला आढळून येईल. पणजी येथे हेड पोस्ट ऑफिस जवळ आमचं स्कूटर दुरूस्तीचं दुकान आहे, तर पणजी पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ' मेरशी ' येथे वास्तव्य आहे.
३१ डिसेंबर २०१६ शनिवारी मी रात्री ९ च्या सुमारास दुकान बंद केलं. त्यादिवशी प्रथम मी ' रायबंदर ' येथे माझ्या एका मित्राकडे गेलो तेथून मेरशी येथे जाण्यास निघालो रस्त्यावर काळोख होता. त्या काळोखात अचानक माझ्या स्कूटर समोर काही तरी काळ्या रंगाचं कुणी तरी आलं धाडकन आवाज झाला माझी ठोस झाली मी स्कूटर वरून दूर फेकल्या गेलो आणि बेशुद्ध झालो. रात्रीच्या त्या काळोखात मी काही वेळ तिथे तसाच राहिलो असतो तर तोच दिवस माझ्या येथील आयुष्यातील शेवटचा दिवस होता. पण मला ओळखणारा एक ' पुंडलिक आमोणकर ' म्हणून तिथे आला, मला मदतरूप ठरला, देवरूप ठरला! अन्यही काही लोक तिथे जमा झाले. पुंडलिक मेरशीला जाऊन त्याच्या अॅक्टीवावर माझ्या पत्नीला व वहिनींना अपघात स्थळी घेऊन आला. बाजूच्याच शेतात एक काळी
गाय उभी होती. तीच काळी गाय अचानक माझ्या स्कूटर समोर आल्याचे पुंडलिकाने दोघींना सांगितलं. आता त्या जागेवर मी नव्हतो माझी स्कूटर तेवढी होती आणि होते रस्त्यावर पडलेले रक्ताचे डाग. रक्तबंबाळ अवस्थेत लोकांनी मला पाहिले. माझं डोकं फुटलं होतं ,कानातून रक्त येत होतं. काॅलर बोन तुटून डाव्या बाजूच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या. मी अर्थातच बेशुद्धावस्थेत होतो. लोकांनी १०८ नंबरला फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावली आणि मला बांबोळी येथील गोवा मेडीकल काॅलेज हाॅस्पिटल मधे दाखल केले. योग असा होता की माझा मोठा भाऊ श्री दिलीप आमोणकर त्याच हाॅस्पिटलला शस्त्रक्रिया विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होता. अपघाताच्या दिवशी तो दौर्यावर होता पण बातमी समजताच तो तातडीने परतला. मला आय सी यू मधे ठेवण्यात आलं. मला पाहून डाॅक्टरांनी पुढील काही दिवस अत्यंत धोक्याचे असल्याचं घोषित केलं आणि आमच्या घरातील वातावरण गंभीर झालं.
अशा प्रसंगात माणसाला त्या दैवी शक्तीची आठवण येते. आमच्या घरी गजानन महाराजांची भक्ती आहेच. सोबत पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचीही कृपादृष्टी आहे. घरात सर्व भावुक झालेत. आय सी यू मधे नातेवाईकांना प्रवेश निषिध्द असला तरी, अगदी सकाळी विशिष्ट वेळात जवळ जाऊन एखादी व्यक्ती पेशंटला पाहू शकते. सौ ललिताने गजानन महाराजांना म्हटलं ' महाराज मिस्टरांमधे चैतन्याची खूण दिसू दे. ' १ जानेवारीला सकाळी गजानन महाराजांची लहान पोथी घेऊन, महाराजांचं नाव घेत ललिता माझ्या बेड जवळ आली. तिने ती पोथी माझ्या अंगाला स्पर्श करीत, नखशिखांत अंगावरून फिरवली. महाराजांना तळमळीने प्रकृती विषयी प्रार्थना केली. मी त्या आठ दिवसात कोमात असल्याने काहीच बोललो नाही पण पोथी फिरत असतानाच मी ' हात दे गो, हात दे गो . परमेश्वर ' असं काहीसं अस्पष्ट पुटपुटलो.
माझी प्रकृती गंभीरच होती. तो दिवस पार पडला. मात्र २ जानेवारीला अचानक डाॅक्टरांच्या हालचालींना वेग आला. दवाखान्यात एकच धावपळ सुरू झाली. माझ्या बेड जवळ कुठलंसं मशीन आणताहेत, डाॅक्टर आपसात गंभीर चेहर्याने बोलताहेत, डाॅक्टरांनी माझ्या छातीवर एका हाताचा तळवा ठेवून दुसरा हात त्या हातावर ठेवून दाब देणं सुरू केलं आहे. अशात एक डाॅक्टर आय सी यू तून बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं ' आमोणकरांच्या सर्व नातेवाईकांना येथे बोलावून घ्या. ' आम्ही प्रयत्न करीत आहोत पण आम्हालाही काही मर्यादा आहेत. " बट आफ्टर ऑल गाॅड इज ग्रेट! "
हे सर्व ऐकून उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. मी जाणार! हे सर्व समजून चुकले. काही दैवी चमत्कारच वेगळं काही घडवू शकतो, या भावनेतून घरी गुरुजींकडून महामृत्युंजयाचा जप करण्याचा निर्णय घेतल्या गेला. सोबतच गजानन महाराजांचं अखंड नामस्मरण सुरू झालं. सोबत कुणी गजानन बावन्नीचं वाचन करू लागलं. महाराजांना आर्ततेने आळवणं होत राहिलं. नामस्मरणात तो दिवस दडपणाखाली पार पडला.मी गेलो नाही! रात्र वैर्याची आहे. जागे रहा अशा गंभीर वातावरणात ती रात्रही पार पडली. जानेवारीची ३ तारीख उजाडली. सूर्य प्रकाश पसरला आणि चमत्कार घडला. माझ्या तब्येतीत लक्षात येण्यासारखा सुधार होऊ लागला. प्रार्थना फळाला आली. हार्ट बीटस् पुन्हा पूर्व पदावर येण्याची सुचिन्हे दिसू लागलीत . कुठल्याही ऑपरेशन शिवाय माझं ह्रदय पूर्ववत धावू लागलं. म्हणता म्हणता ७ जानेवारीचा शनिवार आला. मी शुद्धीवर आलो. डोळे उघडून सर्वांना बघितलं. २२ जानेवारी रोजी मला डिस्चार्ज मिळाला.
इ.स.१९९९ पासून नित्यनेमाने मी शेगांवला जातो आहे. दर श्रावणात घरी गजानन विजयचं पारायण करायचं आणि पारायण पूर्ण झालं की शेगांवला दर्शनासाठी जायचं हा माझा नेम अजूनही सुरू आहे. महाराजांच्या चरणी भावना दृढ आहेत. म्हणूनच हाॅस्पिटल मधून सुटी झाली तेव्हा डाॅक्टरांनी म्हटलेलं वाक्य आम्हाला अजूनही आठवतं आहे.
डाॅक्टर म्हणाले होते, " हे कसं काय घडलं हा एक चमत्कारच आहे. पण एक सुपर पाॅवर आहे हे खरं आहे! "
एनी वे, ऑल द बेस्ट! तब्येतीची काळजी घ्या! "
लोक ज्याला सुपर पाॅवर म्हणतात , आम्ही गजानन महाराज भक्त त्याला समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज. असं म्हणतो आणि असं काही घडलं की हात जोडून त्यांचं स्मरण करतो, श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन !
🌺अनुभव--लक्ष्मीकांत आमोणकर, गोवा
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
*आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे*.
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
*भाग एक* यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास
*भाग दोन* यात एकूण बावन्न अनुभव आहेत (५३ते १०४) फक्त रुपये पन्नास
...........................................
*समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना*
शांतीरस आणि भक्तीरसपूर्ण मनःशांती प्रदान करून गजानन महाराजांची भक्ती प्रदान करणारी उपासना. ऐका आणि सोबत स्वतः म्हणा. संध्याकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी ही उपासना सुरू आहे. गुरुवारी आणि एकादशी ला तर मोठीच पर्वणी.
ऐका ... उपासना लिंक... https://youtu.be/WxKZ91xsve8
...........................................
Comments