अनुभव १३८🌺
- Jayant Velankar
- Nov 5, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव १३८🌺)
समर्थ सद्गुरू गजानना! सदैव तत्पर भक्त रक्षणा
जय गजानन! परमार्थातील अनुभव हे अनुभवण्यासाठीच असतात .अर्थात समविचारी कुणी भेटला तर त्याच्या सोबत आपला अनुभव शेअर केल्याने आपला आनंद द्विगुणित होतो यात शंका नाहीच! आपण सर्व गजानन महाराज भक्त, संतकवी दासगणू महाराज विरचित ' श्रीगजानन विजय ' नित्य नियमाने वाचीत असतो. त्यात एक ओळ आहे. ' प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर .'
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज समाधिस्त झाल्यानंतरही गजानन महाराजांनी भक्तांना अनुभव दिल्याचा उल्लेख ' गजानन विजय ' ग्रंथात आहेच. आजही महाराजांचे अनुभव श्रध्देत वाढ करणारे ठरताहेत. कधी महाराज भक्तांच्या स्वप्नात जाऊन तर कधी तीव्र आंतरिक प्रेरणा देऊन, तर कुठे एखाद्या प्रसंगातून भक्तांना सुवाटेवर आणण्यासाठी, त्यांच्या मनातील भक्तीभाव जागृत ठेवण्यासाठी, माऊलीच्या प्रेमाने मदतीला धावतात असा श्रध्दावान भक्तांचा अनुभव आहे.
पुंडलिक भोकरेच्या मनात निर्माण झालेली गोंधळाची स्थिती त्याच्या स्वप्नात जाऊन महाराजांनी दूर केल्याचं आपण पोथीत वाचतो. मध्यंतरी वर्धा येथील माझी मोठी बहीण सौ चित्ररेखा धानकुटे हिने मला श्रीगजानन अनुभव पुस्तके दिलीत त्यात औरंगाबाद येथील श्री देशपांडे यांचा अनुभव आहे. ज्यात महाराजांनी स्वप्नात जाऊन त्यांना सांगितलं की ' तुझं काम झालेलं आहे! तू शेगांवला जाऊन नवस पूर्ण करू शकतो. ' त्याप्रमाणे त्यांनी शेगांवला रीतसर प्रसाद पंगत देऊन नवस पूर्ण केला आणि नंतर त्यांना कळलं की त्यांचं काम झालेलं आहे .
त्यात असाच एक अनुभव डोंबिवलीच्या मानसी ताईंचा आहे. त्या नियमाने रोज संध्याकाळी पोथीचा एक अध्याय वाचीत होत्या. एक दिवस त्यांना महाराजांनी अत्यंत तीव्रतेने प्रेरणा दिली की तू आज दुपारीच अध्याय वाचावास. म्हणून त्या दुपारी अध्याय वाचायला बसल्या, तेव्हा त्यांना गॅस सिलेंडर लीक झाल्याचा आवाज आला. देवासमोर दिवा होता. त्या घाईने सिलेंडर बंद करण्यासाठी उठल्या पण इतक्यात दिवा आणि सिलेंडर या मधील जागेतील वस्तूंना आग लागून त्या जळाल्या पण अन्यथा जो फार मोठा अनर्थ घडला असता तो मात्र त्या वेळी मानसी ताई तिथे उपस्थित असल्याने टळला होता.
मी श्रीमती रंजना वाघमारे. जबलपूर म.प्र. येथे असते. माझ्याही बाबतीत गजानन महाराजांनी असाच काहीसा
' प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्या वर ' अशा सारखा अनुभव मला दिला अशी माझी श्रध्दा आहे.
वर्धा, (महाराष्ट्र) येथे माझे माहेर. माझ्या माहेरी अध्यात्मिक वातावरण होतं. माझ्या ताईने मला गजानन महाराजांची पोथी देऊन नित्य वाचण्याचा सल्ला दिला. मध्यंतरी माझ्या मिस्टरांचं आकस्मिक निधन झालं. तेव्हा महाराजांचा मोठा आधार वाटून मी दुखाःतून सावरू शकले. सध्या माझा मुलगा प्रियांशू आणि सून शेफाली व मी असे तिघं जण जबलपूरला राहतो आहे.
गेल्या पावसाळ्यातील गोष्ट .माझं गजानन विजय पारायण सुरू होतं. गजानन विजय मधे एक गोष्ट आहे. बाळापूर जवळील मोरगाव येथील मारुतीपंत यांनी त्यांच्या शेतात राखणदार म्हणून तिमाजी नामक माणूस ठेवला होता. खळ्यामधे धान्य ठेवलं होतं. एके रात्री तिमाजीला गाढ झोप लागली आणि गाढवे खळ्यात शिरून धान्य खाऊ लागलीत तेव्हा महाराजांनी तिमाजीला आवाज देऊन जागे केले. त्याचं वर्णन दासगणू महाराज करतात...
राखणदार झोपी गेला/ गर्दभाशी आनंद झाला/ ते खाऊ लागले जोंधळ्याला/ राशीत तोंड घालून/ हा पांड्या मारुतीपंत/ महाराजांचा होता भक्त/ म्हणून सद्गुरू रायाप्रत/ लीला करणे भाग आले/ क्षणात जाऊन मोरगावासी/ हाक मारली तिमाजीसी/ अरे जागा होई त्वरेसी/ रासेशी गाढवे पडली ना/ ऐसे मोठ्याने बोलून/ तिमाजीस जागे करून/ महाराज पावले अंतर्धान/ खळ्यामधून तेधवां...
या ओव्यांची आठवण व्हावी असा प्रसंग माझ्या बाबतीत घडला. १५ ऑगस्ट शनिवार. जबलपूरला त्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू होता. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. घराबाहेर पडता येत नव्हतं. पाऊस सुरू, १६ ऑगस्टची रात्र, आम्ही तिघेही गाढ झोपेत असताना रात्री दीडच्या सुमारास दारावरची बेल वाजली. मला वाटलं आपल्याला स्वप्न पडलं असावं आणि त्यात बेल वाजली असावी. थोड्या वेळाने पुन्हा बेल वाजली, डोळ्यात खूप झोप होती, वाटलं आजूबाजूला वाजली असावी. अर्थात मला असं वाटण्या मागे काही अर्थ होता. कारण मला माहिती होते की माझ्या घरची बेल वाजूच शकत नाही. माझ्या हाॅलच्या दरवाज्याच्या बाजूला भिंतीवर बेलचं बटन आहे. हाॅलचा दरवाजा व त्याच्या पुढे ७ फुटाची रिकामी जागा ( अंगण) आहे .नंतर कम्पाऊण्ड वाॅल आहे. त्या वाॅलवर लोखंडी ग्रिल लावली आहे. हाॅलपासून त्या ग्रिलवर येईल अशा प्रकारे फायबर शीटचं शेड घातलं आहे. हाॅलच्या दारासमोर फाटक येतं. त्याला रात्री कुलूप लावलेलं असतं. कुलूप काढून फाटक उघडून आत आल्या शिवाय कुणी बेल वाजवूच शकत नाही. एवढी खात्री असल्याने मी वाजणार्या बेलकडे दुर्लक्ष केलं, पण मी उठत नाही हे पाहून बेल पुन्हा पुन्हा वाजु लागली. आता मला आश्चर्यही वाटू लागलं आणि खूप भितीही वाटू लागली. पण आता मी हिंमत एकवटली आणि अंथरूणावर उठून बसले. मुसळधार पाऊस सुरूच होता.
मी मुलाला व सुनेला आवाज दिला. त्यांना बेल वाजल्याचे सांगितले. आम्ही सर्व हाॅलच्या दाराजवळ गेलो. भीतभीतच दार उघडलं ,समोर, बाजूला बघितलं पण कुणीच नव्हतं. फाटकाला कुलूप तसंच होतं. मग बाजूच्या खोलीचं दार उघडून बाहेर बघितलं तिकडेही कुणीच नव्हतं. प्रियांशू मला म्हणाला, आई कुणीही नाही. तुला भास झाला असावा, आता तू झोप. प्रियांशू असं म्हणाला तरी मनातून मी जाणून होते की बेल नक्की वाजली होती. कारण एकदा वाजली तर भास! पण अनेकदा मी ऐकली होती. मग मला जागं कुणी केलं? का केलं?:मनात असे प्रश्न घेऊन मी बेडरूम कडे जाऊ लागले, इतक्यात प्रियांशूला पाणी पिण्याची इच्छा होऊन तो स्वयंपाक घरात गेला, त्याने तिथूनच मला आवाज दिला. ' अगं आई, हे बघ स्वयंपाक घरात सर्व पाणी शिरलं आहे. मी तिकडे जातच होते तो डायनिंग रूम आणि हाॅलमधे पाणी शिरू लागलं. स्वयंपाक घरात बेसिनचे पाणी जाण्यासाठी जमिनीलगत जे छिद्र होतं त्यातून वेगाने पाणी आत शिरत होतं. प्रियांशूने प्रथम कापडाचा बोळा घालून ते पाणी बंद केलं. नंतर आम्ही तिघांनी घरातील पाणी बाहेर फेकणं सुरू केलं. तब्बल दीड तास आम्ही पाणी बाहेर फेकत होतो. नंतर आम्ही थकलो आणि हाॅलमधे सोफ्यावर विराजलो. सूनबाई म्हणाली, बरं झालं आपण उठलो नाही तर एव्हाना पूर्ण घरात पाणी शिरून सर्व वस्तू खराब झाल्या असत्या आणि आपलं खूप नुकसान झालं असतं. पण मग बेल वाजली कशी? कुणी उठवलं तुम्हाला? ती असं बोलतच होती तो पुन्हा बेल वाजली. आम्ही तिघेही लगेच उठलो दार उघडून पाहिलं तो फाटक बंदच होतं, कुणीही आलं नव्हतं. मात्र यावेळी बेल आम्ही तिघांनीही ऐकली होती. म्हणजे या आधी मी ऐकलेली बेल हा भास नव्हता तर कुणीतरी मला जागं करण्यासाठी दाराशी येऊन गेलं होतं.
मघाशी मी पाणी बाहेर फेकताना प्रत्येक वेळी गजानन महाराजांचं स्मरण करून पाणी फेकलं होतं किंबहुना आम्ही तिघेही महाराजांचे आभार मानीतच होतो. शेवटची बेल ऐकून आम्हा तिघांचीही दृढ धारणा झाली की आपल्याला सावध करण्यासाठी महाराज आले होते. खरं तर आले होते म्हणण्यापेक्षा त्यांनी अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि आपल्याला सावध केलं .
असो! आम्ही निजण्यासाठी उठलो. मी कृतज्ञतेने महाराजांसमोर उभी झाले आणि मला असं जाणवलं की जणू महाराज म्हणताहेत, ' भक्तांना सावध करण्यासाठी सद्गुरू तत्पर आहेतच. पण भक्तांनीही प्रपंच असो की परमार्थ दोन्हीत अखंड सावध असायलाच हवं आणि त्यासाठी उत्तम मार्ग आहे नामजप! ' ही कल्पना मला सुखावून गेली आणि स्वाभाविकपणेच मी पुटपुटले
श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- रंजना वाघमारे, जबलपूर (मध्य प्रदेश)
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
खरंच आपले महाराज खूप थोर आहेत त्यांच्या लिला अतर्क्य आहेत.