अनुभव १३९🌺 + १४०🌺
- Jayant Velankar
- Nov 19, 2020
- 7 min read
Updated: Jan 23, 2022
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव १३९🌺 + अनुभव १४०🌺)
*श्रीगजानन विजय,कृपाशीर्वाद*
जय गजानन! इ.स.१९३९ च्या सुमारास रामचंद्र पाटलांनी पंढरपूर क्षेत्री जाऊन संतकवी श्री दासगणू महाराजांना श्री गजानन चरित्र लिहिण्याची विनंती केली. त्यानुसार दासगणू महाराज शेगांवला आलेत. ग्रंथ लिखाणाची पूर्व तयारी झाली आणि नंतर सलग एकवीस दिवसात एकवीस अध्याय दासगणू महाराजांनी सांगावेत आणि लेखनिकांनी लिहून घ्यावेत या पध्दतीने पोथी पूर्ण झाली. पोथीचे लेखनिक आदरणीय छगन काका बारटक्के यांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम दासगणू महाराज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणार आणि नंतर गजानन महाराजांचा आशिर्वाद घेऊन श्रीगजानन विजय लिखाणाचं काम सुरू होणार.
भगवंताचे अधिष्ठान प्राप्त झाल्यानंतर, पोथीनं चमत्कार घडविला नसता तरच नवल. 'श्रीगजानन विजयची' निर्मिती झाली आणि त्या माध्यमातून हजारो भाविक शेगांवच्या वाटेवरील वाटसरू झालेत. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचे कृपापात्र झालेत. आजही होताहेत.
काही दिवसांपूर्वी अनेक लोकांनी हा ग्रंथ स्वतः लिहून काढला, तसाच मीही तो एका वहीत व्यवस्थित लिहिला. माझी बहीण सौ सुहास जोशी हिने तर एकवीस दिवसात तो लिहून पूर्ण केला. आम्हा दोघा बहीण- भावानी हा ग्रंथ आमच्या आईला समर्पित केला. आम्ही स्वलिखित ग्रंथ आईला समर्पित करण्याचं कारण आईच्या जीवनात श्री गजानन विजय ग्रंथाचं आणि त्या योगे गजानन महाराजांचं स्थान फार मोठं आहे.
' सुमतीताई बापट ' आमच्या आईचं नाव ' वावोशी ' ता. रायगड तिचं माहेर! वास्तविक तिच्या माहेरी कुणालाही गजानन महाराजांविषयी म्हणावी अशी माहिती नव्हती. पण म्हणतात नं, सर्व योग ठरलेले असतात. गजानन महाराजांनी एका विशिष्ट कार्यासाठी तिची निवड करण्याचं ठरलं होतं.
आमचं कुटुंब मोठं होतं. वडिलांची नोकरी होती, पण घरात हातभार आवश्यक वाटल्याने, आईने विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा उद्योग करण्याचं ठरवलं. आमच्या शेजारी लिमये काकू राहात. एक दिवस त्या गजानन विजय पोथी वाचन करीत असताना आईनं त्यांना पाहिलं व पोथी विषयी चौकशी करून मला वाचायला द्याल कां? असं विचारल्यावरून त्यांनी आईला गजानन विजय ग्रंथ देऊ केला व हा ग्रंथ तुम्हाला निश्चितच आधाररूप ठरेल असं सांगितलं. आईला ग्रंथ वाचताना पाहून वडिलांनी चौकशी केली व त्यांचा ग्रंथ वाचून परत करा आम्ही तुम्हाला ग्रंथ आणून देऊ असं म्हटले आणि आईला त्या काळी रुपये साडेतीन खर्च करून श्रीगजानन विजय ग्र॔थ देऊ केला. ही इ.स.१९६७ ची घटना! आता आईला तिचा स्वतःचा ग्रंथ मिळाला त्यातून आईने जसा वेळ मिळेल तसं ग्रंथ वाचन! हे धोरण स्वीकारलं. काम करीत जायचं, ओव्या वाचीत जायच्या. महाराजांच्या कृपेने तिचं काम भरपूर वाढलं. नाशकात टिसोळकर यांचं चहाचं दुकान होतं. आईने त्यांना खाद्य पदार्थ ठेवण्याविषयी विचारलं. महाराष्ट्र भांडार मधे आईला रोज पिंपभर वस्तू पुरवाव्या लागत. आईवर कामाचा ताण वाढला पण आईचं वाचन त्यातही सुरूच होतं. ओव्या वाचायच्या ,काम करायचं, पोथीला प्रदक्षिणा करीत महाराजांना म्हणायचं,महाराज असं मधेच सोडून काम करणं काय बरोबर वाटतं का हो?मला पोथी पाठ झाली तर सलग नाही कां मी म्हणू शकणार? असं महाराजांना म्हणत असतानाच काम करणं, पोथी वाचणं, क्रम सुरूच होता आणि एक दिवस आईला महाराजांनी जाणीव करून दिली की तुला पोथी पाठ झाली आहे.
अशात आईच्या परिचयातील एक घाटे म्हणून बाई होत्या. त्यांना गजानन महाराजांचं फार होतं. एका प्रकट दिनाला त्यांच्या घरी त्यांनी आईला प्रसाद वाटपाची जबाबदारी दिली.ती स्वीकारताना आईनं त्यांना सांगितलं, मी प्रसाद वाटपाचं काम करीन, पण मी कुणाशीही बोलणार नाही व कुणीही माझ्याशी बोलू नये. त्या प्रकट दिनाला प्रसाद वाटत असतानाच आईनं पूर्ण गजानन विजयचं पारायण केलं तोच आईचा पहिला पण अप्रसिद्ध असा पारायणाचा कार्यक्रम. पुढे आईनं आजूबाजूच्या काही मुलांना एकत्र बसवून, त्यांच्या हाती पोथी देऊ केली आणि स्वतःला पोथी पाठ झाली आहे याची परीक्षा करून घेतली. एवढा मोठा गजानन विजय ग्रंथ मुखोदगत असणं ही आजही विशेष गोष्ट आहेच. परंतु इ.स.१९७३-७४ च्या सुमारास म्हणजे ४५-४६ वर्षांपूर्वी तर प्रत्येकाच्या चेहर्यावर आश्चर्याचा भाव आणणारी ही गोष्ट होती. तेव्हा घाटे बाई आईला त्यांच्यासोबत शेगांवला घेऊन गेल्या आणि त्यांनी आईचा परिचय पुरुषोत्तम हरी पाटलांशी करून दिला.
मुखोदगत झालेला हा ग्रंथ, आईने त्या काळीच एका मोठ्या वहीत व्यवस्थित लिहून काढला. आईला मनातून वाटत होतं की हा ग्रंथ पुरुषोत्तम हरी पाटलांनी पहावा व निदान त्यातून चार ओव्या वाचाव्यात. त्या काळी शेगांवहून महाराजांची पालखी अगदी हत्ती घोडे लवाजम्यासह वेगवेगळ्या ठिकाणी जात असे. तशी ती नाशिकला येत असे. तेव्हा नाशिकला पालखी आली होती. आईने पुरुषोत्तम दादांना पोथी दाखवून तिची इच्छा बोलून दाखविली. पण त्या दिवशी गजानन महाराजांची योजना काही वेगळीच होती. पुरुषोत्तम दादांनी पोथीची दोन पानं वाचली, नंतर त्यांना झालेल्या प्रेरणेवरून त्यांनी ती पोथी हत्तीच्या सोंडेत दिली. हत्तीने ती वर अंबारीत दिली. काही सेकंदानी हत्तीने ती पोथी पुन्हा आईला दिली. त्या पोथी सोबत दोन फुलंही आईला आशिर्वादरूपी प्राप्त झालीत.आईनं ते सर्व सांभाळून ठेवलं. आजही आई मुखोदगत पारायणाचे कार्यक्रम करते तेव्हा महाराजांसमोर ती आशिर्वाद प्राप्त पोथी असते.
तेव्हा आजच्या सारखा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट नव्हता पण भक्तांकडून भक्तांना ' सुमतीताईं च्या ' पाठांतरीत पोथी पारायणाविषयी समजत गेलं आणि विविध ठिकाणी आईचं पोथी वाचणं, खरं तर पोथी म्हणणं सुरू झालं. भक्तगण आग्रहाने आईला त्यांच्यासोबत शेगांवला चलण्याचा आग्रह करू लागले.महाराजांनी या माध्यमातून आईला वेगवेगळे अनुभव देऊन तिच्याकडून दीर्घकालीन ही सेवा करून घेण्याचं जणू योजिलंच होतं. असंच एकदा पुण्याच्या काही भक्तांसोबत स्वतंत्र बस करून आई शेगांवला जायला निघाली. श्री शिन्त्रे यांनी ती सहल आयोजित केली होती. बस मधे प्रवासात केव्हातरी आईचा डोळा लागल्यासारखं झालं आणि आईला काहीसं असं दिसलं की समोर एक खुंटी आहे आणि त्या खुंटीवर एक निळा कोट टांगून ठेवला आहे. आईनं शिन्त्रेना म्हटलं शिन्त्रे, समोर खुंटीवर निळा कोट टांगून ठेवलेला दिसतो आहे. त्यावर शिन्त्रे बोलले अहो ताई ही बस आहे, इथे कशाची खुंटी आणि कुठला कोट? त्यांचं बोलणं तिथेच संपलं. बस शेगांवला पोहोचली.सर्वांनी व्यवस्थित दर्शन घेतलं. पारायण मंडपात आईचं बसून झालं. चिंतन झालं. सर्व बाहेर मोकळ्या जागेत जमले तो ' शिन्त्रे ' कुठे दिसेनात आई बाकीच्यांना म्हणाली हे काय शिन्त्रे कुठे दिसत नाहीत? इतक्यात समोरून घाईघाईने शिन्त्रे येताना दिसले. ते म्हणाले ताई चला लवकर आपल्याला एका विशेष व्यक्तीची भेट घ्यायची आहे. आपल्याला त्यांनी पाच मिनिटे भेटण्याचं मान्य केलं आहे .मी तुमच्या विषयी त्यांना बोललो आहे. चला लवकर. आई त्यांच्या मागून चालू लागली. तेव्हा विशेष लोकांसाठी वरील मजल्यावर सोय केलेली असायची,दोघेही वरच्या मजल्यावर पोहोचले.एका खोलीत पलंगावर एक गृहस्थ बसले होते. अंगावर पांढरे शुभ्र धोतर, वर पांढरा स्वच्छ शर्ट. शिन्त्रे त्यांचा परिचय करून देणार, इतक्यात त्या दोघांचीही नजर समोरील भिंतीवर गेली. भिंतीवर खुंटी होती आणि खुंटीवर टांगला होता निळा कोट. आईनं चमकून शिन्त्रेंकडे पाहिलं, त्यांच्याही चेहेर्यावर संमिश्र भाव उमटले होते. त्या कोटाकडे पाहून आई उद्गारली श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन! पुढे चालू............. . ( अनुभव क्रमांक १४० 🌺)
------
जय गजानन! शेगांवला आई आणि शिन्त्रे त्या गृहस्थांना भेटण्यासाठी म्हणून खोलीत शिरले .त्या दोघांचीही नजर भिंती वर गेली. तिथे खुंटीला टांगलेला निळा कोट पाहिला, ते पाहून शिन्त्रेना आश्चर्य वाटले आणि आईने हात जोडून गजानन महाराजांचं स्मरण केलं.
शिन्त्रे यांनी परिचय करून दिला. ' ताई, हे छगन काका बारटक्के. दासगणू महाराजांनी सांगितलेल्या गजानन विजय पोथीचे छगन काका लेखनिक आहेत. आईने ते ऐकून अत्यानंदाने छगन काकांना नमस्कार केला. छगन काकांना पाठांतराचं समजल होतंच, त्यांनी आईला विचारलं, कुठला अध्याय म्हणणार? आई म्हणाली जो तुम्ही सांगाल तो. ते म्हणाले ठीक आहे. पहिलाच अध्याय सुरु करा. आई खाली बसली. महाराजांचं स्मरण केलं आणि पहिला अध्याय सुरु झाला. ' जय जयाजी उदार किर्ती/ जय जयाजी प्रताप ज्योती....
अध्याय पुढे सरकू लागला. पांच मिनिटे झालीत. छगन काकांचे डोळे भरून आलेत. ते पलंगावरून खाली उतरले, आईच्या पुढे डोके टेकले आणि ओक्साबोक्शी रडू लागले.ओव्या तिथे थांबल्या, आईला संकोच झाला, ती बोलली अहो हे काय करताय? हुंदका प्रयासाने थांबवत छगन काका बोलले, ताई, हा तुमच्या भक्तीला, गजानन महाराजांच्या किमयेला आणि दासगणूंच्या प्रतिभेला माझा नमस्कार आहे. त्या क्षणापासून छगन काका आणि आई मधे भावा- बहिणीचं नातं निर्माण झालं आणि आमच्या साठी ते छगन मामा झाले. पुढे ते आमच्या घरी बरेचदा आले आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप काही ऐकायला मिळाले.
गजानन महाराजांच्या कार्यक्रमाला नाही म्हणायचं नाही असं आईनं ठरविलं होतं. त्यामुळे आईच्या कार्यक्रमांची संख्या झपाट्याने वाढत गेली. आज अशी कित्येक गावं आहेत की जिथे लगातार एकवीस वर्षे आईची पारायणं झाली आहेत. प्रवास आणि पारायण या माध्यमातून महाराजांनी आईला अनुभव समृद्ध केलं. एकदा खामगाव जवळ एका शेतकर्याने त्याच्या शेतात आईचं पारायण ठेवलं. तेव्हा त्या शेतात काही पिक नव्हतं. आई शेगांवहून महाराजांचा अंगारा घेऊन गेली. तिथे पारायण झालं. शेतात अंगारा टाकण्यात आला, आजही आई त्या बहरलेल्या शेताकडे पाहते तेव्हा महाराजांच्या भक्तीने उर भरून येतो.
आपल्या मराठीत एक म्हण आहे ' स्वभावाला औषध नसतं ' पण सद्गुरूंची कृपा झाली तर तेही अशक्य नाही असा अनुभव महाराजांनी आईला प्राप्त करून दिला. आईचा स्वभाव मुळात करारी आणि वागणूक शिस्तबद्ध! स्वाभाविक आहे की असा माणूस इतरांकडूनही तशी अपेक्षा करतो, प्रसंगी समोरच्याला सल्ला देतो. अर्थात पुढच्याचं भलं व्हावं ही प्रामाणिक इच्छा त्यामागे असते. पण समोरचा त्याकडे लक्ष देत नाही तेव्हा त्रास मात्र सल्ला देणार्याला होतो. आई कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक गावी, अनेक ठिकाणी जाणार. सर्व ठिकाणी अगदी स्वयंपाक घरापासून विविध ठिकाणी बोलण्याचा प्रसंग येणार. आईला वाटू लागलं आपण प्रत्येक ठिकाणी शांत बसू शकलो तर किती बरं होईल ? असं वाटून तिनं महाराजांना प्रार्थना करणं सुरू केलं. महाराज कशानं हो माझ्या वृत्तीत बदल घडेल? अर्थात हे सगळं आईच्या मनात !अन्य कुणाला याची कल्पना असण्याचा प्रश्नच नव्हता. आईच्या मनात हा विचार घोळत होताच अन् त्याच सुमारास चिंचवड येथील श्री पवार व अन्य काही भक्तांसोबत तिचं शेगांवला जाणं झालं. चैत्र महिना, रामनवमीचा उत्सव, प्रचंड गर्दी. महाराजांचं दर्शन घेऊन आई पारायण मंडपात शिरली. स्वभावाला औषध काय? हा प्रश्न मनात फेर धरून होताच. आईला समोर लाकडी कठड्याजवळ बसण्याची सवय आहे. तिच्या प्रयत्नाने आणि महाराजांच्या इच्छेने, तिला तिथे जागा मिळाली. गादीवर विराजमान महाराजांकडे ती पाहत होती. इतक्यात विठोबा-रखुमाई समोर असलेल्या धुनीच्या जवळून एक धोतर सदरा घातलेले आणि डोक्यावर फेटा असलेले गृहस्थ, आईच्या दिशेने चालत पुढे आले. त्यांनी आईच्या मांडीशी एक कागद टाकला आणि निघून गेले.
काही क्षण आईच्या लक्षात आलं नाही पण लगेच तिनं उत्सुकतेने तो कागद उघडून बघितला, बघते तर काय आश्चर्य? त्यावर लिहिले होते... अहिल्या द्रौपदी सीता/ तारा मंदोदरी तथा/ पंचकन्यां स्मरे नित्यम/ महापातक नाशनम.. हा श्लोक लिहून पुढे लिहिले होते, हा श्लोक रोज पांच वेळा म्हणावा. असे केल्याने वृत्तीत फरक पडेल. ते पाहून आईला अतिशय आनंद झाला. तिच्या मनातील प्रश्नरुपी वादळ शांत झालं. याचा आनंद तर तो होताच परंतु सश्रद्धतेने, समर्पण भाव ठेवून आपण महाराजांना शरण गेलो की महाराज आपल्याला मार्ग दाखवतातच या विषयी आलेल्या अनुभवातून मिळणारा तो आनंद होता.
आईच्या पाठीशी आज असे अनेक अनुभव जमा आहेत. कधी विषय निघाला तर ती ते आम्हाला सांगते.पण तिचं या अनुषंगाने नेहमीच सांगणं असतं की अनुभव सांगायचे तर त्यामागे शुद्ध हेतू असावा. भक्तीचा! असे अनुभव ऐकून सांगणार्याच्या आणि ऐकणार्याच्या मनात गजानन महाराजांविषयी श्रध्दा निर्माण होऊन दोघांच्याही मनात महाराजांविषयी असलेल्या भक्तीत वाढ होत असेल तरच त्याला अर्थ आहे. खरं आहे तिचं म्हणणं!
तेव्हा तिचे हे अनुभव वाचून आपल्या मनातील भक्तीभाव वाढावा यासाठी आपण गजानन महाराजांना प्रार्थना करू या आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन म्हणू या. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- रमेश बापट नाशिक
सौ सुहास जोशी ,नाशिक
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
🌸आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
*अवश्य वाचा श्रीगजानन अनुभव पुस्तक*
*भाग एक* यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास
*भाग दोन* यात एकूण बावन्न अनुभव आहेत (५३ते १०४)
फक्त रुपये पन्नास.
.........................
Comments