अनुभव १४१🌺
- Jayant Velankar
- Dec 17, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव १४१🌺 )
*संकटकाळी साथ देती संत अथवा देव हो!*
जय गजानन! जीवनात कधी कधी भगवंत परीक्षेचे असे क्षण आणतो की सर्व सामान्य माणसाने कोलमडून पडावं. संकटे येतात तीही अनेक रुपांनी. मुळात, अतिशय सामान्य पध्दतीचं आर्थिक जीवन ज्याच्या वाट्याला आलं आहे , ज्यानं अतिशय कष्टाने पै पै जोडून जीवनाचा आर्थिक गाडा ओढला आहे, अशा माणसाने महत् प्रयासाने जमा करून ठेवलेली जी काही जमापुंजी आहे, ती जर एका क्षणात नाहीशी झाली, होत्याचं नव्हतं झालं. तर त्या आपत्तीला काय म्हणावं? सर्व सामान्य माणसाने अशा प्रसंगी काय करावं?
सर्व सामान्य माणूस अशा धक्क्यानं पार कोलमडून पडतो, खचतो. त्याचं जीवन उध्वस्त होऊन जातं. एखादा सामान्य भक्त असेल तर तो दैवाला दोष देतो, स्वतःच्या चुकांचा शोध घेतो. आपल्या देवतेला बोलतो. मग दैव योगात असेल आणि सद्गुरूंची कृपा झाली तर ती कृपा त्याला सावरण्यासाठी मदतरूप ठरते.
हे सर्व विचार गेल्या काही वर्षांपासून माझ्या मनात फेर धरून नाचताहेत. याचं कारण माझ्या आईच्या जीवनात असा प्रसंग घडला, तो मी जवळून पाहिला.
मी सौ विद्या बोडस, मुंबईला असते. माझी आई सुनंदा तांबोळी, पुण्यात असते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला हे माझ्या आईचं माहेर! आईचे वडील व्यवसायाने शिंपी होते. पूर्वीच्या काळी कुटुंबाची व्याप्ती मोठी असायची, तशी ती आईच्या माहेरी होती. एक शिंपी म्हणून त्या काळी मिळकत ती काय असणार? त्यामुळे फारसा पैसा असा आईने पाहण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे आईचं लग्न झालं. आमचे वडील मिल मधे काम करायचे, अर्थातच एका मिल कामगाराची आर्थिक स्थिती आईला लग्नोत्तर प्राप्त झाली. मी आणि माझा मोठा भाऊ विनय असं चौघांचं कुटुंब! आईचं शिक्षण फारसं नाही. मग आर्थिक हातभार म्हणून, कुठे मुलं सांभाळण्याचं काम, लोकांसाठी लहान मोठी कामं, शिवण काम, लहान मुलांना काही शिकवणं. अशी कामं करणं आईला भाग होतं. भविष्यातील आर्थिक स्थितीची कल्पना जणू तिला होती, म्हणून ती जसं जमेल तसं अगदी थोडं का होईना सोनं विकत घेत होती. काही सोनं आणि चांदी, स्वतः घेतलेलं किंवा लग्नात कुणाकडून मिळालेलं, तिनं जपून ठेवलं होतं.
आईच्या कर्तव्यतत्पर वागणूकीला 'श्री गजानन विजय ' वाचनाचा फार मोठा आधार होता. गजानन विजयचं नित्य पारायण आणि गजानन महाराजांची भक्ती याच आधारावर तिने संसाराचा भार सहन केला होता. म्हणूनच मिल कामगारांचा संप होऊन संप चिघळला आणि हजारो कामगार बेकार झाले तेव्हा आमच्या वडिलांवरही घरी बसण्याची पाळी आली तेव्हा आईनेच महाराजांच्या आशिर्वादाने संसाराचा भार सांभाळून आम्हाला आधार दिला. ते एक संकटाचं रूप आम्ही जवळून पाहिलं. महाराजांच्या आशिर्वादानं तिनं तिच्या दोन्ही मुलांची लग्न पार पाडलीत. मी लग्न होऊन मुंबईला राहू लागले.
वडिलांची नोकरी गेल्यावर आईने जमेल तसा भार सांभाळून घराचा सांभाळ केला त्यामुळे अगदी रस्त्यावर येण्याची पाळी नव्हती तरी बिना पैशाचं जीवन जगणं केवढं कठीण आहे ते आम्ही अनुभवलं. अशातच एक दिवस आई बाबा मुंबईला माझ्याकडे आलेत. काय योग होता माहिती नाही. तिकडे पुण्याला भाऊ आणि वहिनी नोकरी निमित्ताने बाहेर गेले असताना भर दुपारी, चोरांनी घरात प्रवेश मिळवून, कपाटाची दारं, लाॅकर तोडून घरात होता नव्हता तो सर्व ऐवज नाहीसा केला. आईनं अतिशय कष्टाने जमा केलेलं सर्व सोनं, चांदी चोरीला गेलं. आधीच पैशाची आवक नाही वरून भविष्यात कुणा पुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, अडीनडीला आधार असावा म्हणून जमा केलेली सर्व पुंजीही नाहीशी झाली.
हे आईला कळलं आणि तिच्या मनावर जबरदस्त आघात झाला. पुण्याला गेल्या गेल्या तिनं अंथरूण धरलं. मी आणि भावाने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण देवाने ही वेळ माझ्यावर का आणली? मी कुठे चुकले? पैसे मी कष्टाने कमाविले होते. ' देवा गजानन महाराजा का ही वेळ यावी? अशा विचारात तिने एक दीड महिना अंथरूण धरून ठेवलं. अशा सर्व धक्क्यातून सावरण्यासाठी काळ जाणे हाच मार्ग असतो. काही काळात ती अंथरुणातून उठली. गजानन महाराजांच्या मूर्ती समोर बसून त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केला आणि तिला काय वाटलं तर तिने ती मूर्ती पाण्यात ठेवली. असं केल्यानं चोरी गेलेल्या वस्तू सापडतील अशी तिची भाबडी समजूत! तिला अनेकांनी समजावलं, चोरी गेलेली वस्तू आपल्याकडे कधी सापडते का? एकदा चोरी झाली की ती वस्तू गेलीच म्हणायची. एकीकडे ते तिला पटतही होतं आणि दुसरीकडे ती महाराजांना सारखं म्हणत होती, मी जर प्रामाणिकपणे तुमची सेवा केली असेल आणि गाळलेल्या घामातून केलेल्या मिळकतीतून मी हे सोनं चांदी जमवलं आहे तर मला माझा ठेवा परत मिळायला नको का? अशात ऋषीपंचमीचा दिवस जवळ आला. ऋषीपंचमी! महाराजांचा समाधी दिवस! आतून आई अत्यंत अस्वस्थ झाली. तिला वाटू लागलं की आपण महाराजांना फारच त्रास दिला. ऋषीपंचमीच्या दिवशी सकाळी तिने ती मूर्ती पाण्यातून काढून स्वच्छ पुसली. मूर्तीला अभिषेक केला आणि त्या मूर्ती समोर बसून अक्षरशः ढसढसा रडली. कदाचित त्या ऐवजासाठी मी केलेल्या कष्टांकडे तुमचं लक्ष नसावं, किंवा मी भक्तीत कुठे कमी पडले असेन. मला क्षमा करा. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. असं म्हणून साश्रु नयनांनी मूर्तीला फूल वाहून ती उठली.
सकाळी ऑफिसच्या वेळी नित्याप्रमाणे भाऊ वहिनी बाहेर पडले. दुपारची वेळ होती. आई जेवायला बसली होती आणि दारावरची बेल वाजली. कोण आलं म्हणून आईनं दरवाजा उघडला, पाहते तो दाराशी पोलीस उभे होते. पोलीसांनी दोन चोरांना पकडून आणलं होतं. त्या चोरांनी चोरी केल्याचा कबूली जबाब दिला होता आणि कोणत्या घरी आम्ही चोरी केली ते दाखविण्यासाठी पोलीस त्यांना घेऊन आले होते. चोरांनी चोरी कशी केली ते दाखविले आणि पोलीस निघून गेलेत. आईने मूर्ती समोर लोटांगण घातले आणि पुन्हा खूप रडली. पण सकाळचे रडणे आणि आताचे रडणे यात जमीन अस्मानाचा फरक होता....
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांसमोर तिचं गार्हाणं मंजूर झालं होतं. शुध्द चित्ताने, अंतःकरणापासून हाक मारली तर महाराज हाकेला धावतात असा अनुभव तिला आला होता.
पुढे यथावकाश सरकारी सोपस्कार पार पडले. भावाला वकील करावा लागला परंतु जेवढा ऐवज गेला होता तेवढा पूर्ण परत मिळाला. नंतर आई बाबा शेगांवला गेले तिथे गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं .अन्नदानार्थ पैसे दिले. संस्थानतर्फे मिळालेल्या प्रसादाचा माथ्याला स्पर्श केला अन् महाराजांचं स्मरण केलं.. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ विद्या बोडस, डोंबिवली
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
🌸आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
*अवश्य वाचा श्रीगजानन अनुभव पुस्तक*
*भाग एक* यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास
*भाग दोन* यात एकूण बावन्न(५३ ते१०४) अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास
जगाच्या पाठीवर भक्ताने कोठूनही हाक मारावी आणि गजानन महाराजांनी त्याची मनोकामना पुर्ण केली नाही असे होणारच नाही.
" जय गजानन "
गजानन माऊली भक्ताच्या हाकेला धावली. काय बोलणार ? माऊलींची लिला अगाध आहे..
गजानन महाराज ऑनलाइन आरती
आरती