अनुभव - 2
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 2 min read
Updated: Jun 12, 2020
*श्री*
*🙏 जय गजानन 🙏*
*उद्विग्न मनाला आधार...गजानन महाराज.. *
माणूस कितीही मोठा झाला,हुशार म्हणून नाव मिळालं,अगदी अर्थशास्त्राचा मोठा प्राध्यापक झाला तरी आर्थिक विवंचना सतावू लागते, मन विषण्ण होते, उदास होते. तेव्हा आधार संत अथवा देवाचाच वाटतो.
आमचे एक मित्र अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले, साठी पूर्ण झाली ते सांगत होते,बर्याच दिवसापासून मन अस्वस्थ होते. आर्थिक विवंचना सतावत होती. आपलं कुणी नाही,कुणाचा आधार नाही असं वाटू लागलं.
लहानपणा पासून गजानन विजय नित्य नियमाने वाचत आलो. गजानन महाराजांचच स्मरण करीत आलो, त्या दिवशी सकाळ पासून मनाची विचित्र घालमेल होत होती. महाराज आहे असं आपण म्हणतो पण महाराजांनी कधी दर्शन दिले नाही. मनाच्या त्या विषण्ण अवस्थेतमहाराजांच्या समोर ऊभा राहीलो,हात जोडले आणि महाराजांना आर्त हाक मारली,म्हटलं आम्ही तुमची भक्ती करतो पण तुम्ही आहात याची काही तरी खूण आज मला दाखवा. प्रत्यक्ष दर्शन तुम्ही द्यावं एवढी माझी भक्ती नाही. पण निदान असं काही करा की माझ्या मनाला तुमचा भक्कम आधार वाटावा. आज दिवस भरात मला कशाही स्वरूपात काही ना काही धनलाभ झाला तर मी त्याला तुमच्या अस्तित्वाची खूण मानील.
त्या प्रार्थने नंतर दिवसाचा बराच वेळ निघून गेला,दुपार संपत आली कुणी आले नाही की कुठून धनलाभ होईल असं चिन्हही दिसलं नाही. मी रोज संध्याकाळी पायी फिरायला जातो चांगला पांच किलोमीटरचा फेरा असतो. त्या दिवशी फिरायला बाहेर पडलो तर पूर्ण वेळ नजर रस्त्यावर भिरभीरत होती. कुठे काही सापडतं का याची शोध घेत होती. शहरातून पूर्ण पाच किमी चा फेरा झाला पण कुठेही काहीही सापडले नाही. कसं सापडणार?पैसे का रस्त्यावर पडले असतात?
मन पूर्ण खचून गेलं. माझ्या नित्याचे नियमानुसार मी दिक्षा भूमी ग्राउंड वर व्यायाम करतो आणि नंतर घरी परततो. नेहमीच्या जागी पोहोचलो तर तिथं एक जोडपं गप्पा करीत बसलं होतं मग काय मन अजूनच खट्टू झालं आणि जागेचा शोध घेत मी तिथून दूर एका झाडाखाली जागा शोधली. व्यायामाच्या स्थितीत ऊभा राहीलो. मन म्हणू लागलं गजानन महाराजा मला लहान पणा पासून तुझाच ध्यास होता. देवा तुझ्या शिवाय मला कुणाचा आधार आहे?का परीक्षा पाहतोस. मनात एकीकडे हा विचार आणि शरीराने यांत्रिक हालचाल सुरू केली डाव्या पायाला ऊजवा हात लावण्या साठी खाली वाकलो आणि डाव्या पायासमोर एक फुटावर काहीसं दिसलं. पाहीलं तर वर धूल जमा होऊन खाली दहा रूपयाची नोट होती. ती नोट ऊचलली कपाळाला लावली मन आनंदाने मोहरून उठलं. सर्व औदासीन्य दूर झालं होतं. गजानन महाराज आहेत. गजानन महाराज आहेत. म्हणत घराकडे परतलो,नोट स्वच्छ करून प्लॅस्टिक मधे ठेवली आंघोळ करून पोथी वाचायला बसलो ती नोट पोथीतच ठेवली.
खरं सांगतो त्या दिवसापासून आर्थिक चणचण कधी भासलीच नाही. पण त्याही पेक्षा मनाला महाराजांनी जी ऊभारी दिली ती अजूनही टिकून आहे. आणि मन सतत ग्वाही देत आहे...
आहे.. आहे..महाराज आहेत..
....जयंत वेलणकर.
9422108069.........
गजानन महाराजांविषयी तुमच्या अनुभवांचे स्वागत आहे.
*.....🙏 जय गजानन.....🙏*
Comments