अनुभव १३६🌺
- Jayant Velankar
- Oct 8, 2020
- 4 min read
Updated: Oct 9, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय
*भक्त वत्सल*
जय गजानन! तीन वर्षांचा लहान मुलगा. त्याच्या मनात जिन्याचं आकर्षण. त्यामुळे अजाणतेपणाने आई बाबांचं लक्ष नाही असं पाहून जिन्याकडे जातो. जिन्यात डोकावून पाहतो आणि तोल जाऊन खाली पडतो, अचानक सर्व झाल्याने जोरात रडतो. चक्क आठ नऊ पायर्या धडधडत, गडगडत खाली येतो, तिथेच बाजूला असलेल्या रेतीवर विसावतो आणि तिथे बसून रडू लागतो. आई वडील काळजीनं त्याच्याकडे धाव घेतात. आई म्हणते, डाॅक्टरकडे चला! डाॅक्टरकडे चला! वडील म्हणतात, शांत हो. आधी प्रथमेशला कुठे लागलंय ते बघ, काय झालंय ते पहा मग आपण ठरवू. आई मुलाला उचलून कडेवर घेते. त्याला फक्त कपाळावर टेंगूळ आलेलं असतं. बाकी कुठेही काहीही नाही. ते लहान मुल आईला सांगतं. आई मी पडला. आई त्या आजोबांनी मला धरला. ते बोबडे बोल ऐकून आईच्या डोळ्यांमधून प्रेमाश्रूंचा पूर सुरू होतो. आई प्रेमातिरेकाने त्याला छातीशी घट्ट धरते. आईला आठवतं आज सकाळीच तिच्या मैत्रिणीने गजानन महाराजांचा प्रसाद म्हणून दिलेला मोदक याने पूर्ण फस्त केला होता. आई मनातून गजानन महाराजांचे आभार मानते आणि आईला गजानन विजय ग्रंथात महाराजांचं मंदिर बांधित असताना तीस फुटांवरुन खाली पडलेल्या मजुराची गोष्ट आठवते, अन् आठवतात एकविसाव्या अध्यायातील त्या ओव्या... या तुझ्या पडण्याने/ स्पर्श केला समर्थांने/ तुझ्या करा कारणे/ ऐसे भाग्य कोणाचे? ..
मी त्या मुलाची आई! मी सौ विशाखा विजय गोखले. भाईंदर, मुंबईला असते. मी शाळेत नवव्या वर्गात असताना, एकदा शेजार्यांकडून ऐकून, त्यांच्याचकडून 'गजानन विजय ' ग्रंथ घेऊन वाचला होता. तेव्हाच माझ्या मनात ' गजानन महाराज ' हा आकर्षणाचा विषय होऊन बसला. मात्र मी शेगांवला जाण्याचा योग येण्यात मधे बराच मोठा काळ जावा लागला. मात्र हा काळ मोठा असला तरी महाराजांच्या चरणी मात्र माझं नाव नोंदविल्या गेलं होतं हे मला महाराजांनी पुढे वेळोवेळी निदर्शनास आणून दिलं.
प्रत्येकाच्या मनात एक वैचारिक द्वंद्व नेहमीच सुरू असतं, तसं ते माझ्याही मनात असायचं आणि असतं. माझं एक मन म्हणायचं आपण भक्ती करीत असताना खरं तर आपली भक्ती निरपेक्ष असायला हवी. पण ठीक आहे, आपण संसारी माणसं महाराजांकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो, ठीक आहे, ठेवा. पण मग आपण महाराजांसाठी काय करतो? आपल्या भक्तीत काही प्रखरता असायला हवी की नाही?
माझ्या याच विचारातून मी प्रथमेशच्या जन्माच्या वेळी घेतलेला एक निर्णय मला सांगावासा वाटतो. प्रथमेश आमचा लहान मुलगा. वेदश्री त्याची मोठी बहीण.
आमच्या ' प्रथम ' च्या जन्माच्या वेळी मी शेगांवला गजानन महाराजांकडे एक मुलखावेगळी मागणी केली होती. मनात आलं, आपलं मागणं महाराजांपर्यंत पोहोचलं की नाही हे पुढे कळेलच पण मी काय करते तेही महत्वाचे आहे. तेव्हा माझे नऊ महिने पूर्ण भरत आले होते. गजानन विजयचं पूर्ण पारायण करायला मला आज चार तास लागतात. तेव्हा सुरूवात होती. तेव्हा मला सात तास लागायचे. माझ्या मनाने गजानन विजयच्या पारायणाचा निर्णय घेतला. अत्यंत अवघडलेल्या त्या स्थितीत मी सकाळी पाच वाजता शुचिर्भूत होऊन पारायणाला बसले आणि तब्बल सात तास घेऊन, दुपारी बारा वाजता माझं एकासनी पारायण पूर्ण झाले. नंतर मी भाकरी, पिठलं, मोदक असा साग्रसंगीत नैवेद्य दाखविला.अर्थात जन्माला येता येताच ' प्रथम ' गजानन विजयचं वाचन करून जन्माला आल्यामुळे त्याला गजानन महाराजांचा कृपास्पर्श प्राप्त होऊ शकला आणि त्याच्या विषयी त्याच्या आईने केलेली मागणीही महाराजांनी पूर्ण केली.
आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मी मुलखावेगळं काय मागणं मागितलं होतं? सांगते!
१९८७ चा मे महिना. विदर्भातला तो प्रखर उन्हाळा! मी दुसरे वेळ सहा महिन्यांची गरोदर! सोबत आई, वडील, बहिणी, मिस्टर आणि साडेतीन वर्षांची लेक. सूर्य आग ओकत होता. आम्ही अकोल्याला नातेवाईकांकडे जाणार होतो. शेगांवला जाण्याचा विचार मनात आला. माझ्या मनात गजानन महाराजांविषयी आकर्षण! बाकी लोकांना त्यात फारसं स्वारस्य नव्हतं. माझ्या हट्टाखातर आम्ही सर्व शेगांवला दर्शनासाठी उतरलो. तेव्हा भुयारातून समाधी मंदिरात जावं लागायचं. महाराजांसमोर उभी झाले अन् मन भरून आले. मी लेकीला, वेदश्रीला तिच्या बोबड्या बोलातून महाराजांच्या चरणी प्रार्थना म्हणावयास सांगितली. सर्व उपस्थित तिची प्रार्थना ऐकत होते.. ' मला छान गोरापान, गोजिरवाणा, डाव्या गालावर खळी असलेला भाऊ हवा आहे. '
आमच्या घरात कुणालाही खळी पडत नाही. माझ्या मुलाच्या गालावर खळी पडावी असं कल्पनाचित्र मी मनात रेखाटलं होतं. वेदश्रीची प्रार्थना ऐकून सर्व म्हणाले, व्वा! मुलगा हवा, गोरा हवा, खळी हवी. बघू काय करतात तुझे गजानन महाराज.
३० ऑगस्ट १९८७ ऋषीपंचमीचा दुसरा दिवस. आदले दिवशी मी प्रार्थनापूर्वक, भावपूर्ण अंतःकरणाने महाराजांचा प्रसाद ग्रहण केला आणि ३० ऑगस्टला सूर्योदयाच्या मुहूर्ताला वेदश्रीला गोरापान, गोंडस भाऊ झाला. शेगांवला समाधी मंदिरात वेदश्रीने केलेल्या प्रार्थनेला महाराज पावले. सहाव्या महिन्यातील त्या प्रार्थनेला नवव्या महिन्यातील पारायणाची जोडही मिळाली होती.
आता छान, गोरापान, गोजिरवाणा हे सर्व स्पष्टच झालं होतं. प्रश्न होता गालावरील खळीचा , मधल्या काळात मी महाराजांना सतत म्हणत होते, महाराज वेदश्रीने केलेली प्रार्थना उपस्थित सर्वांनी ऐकली आहे. प्रार्थना पूर्ण होणं म्हणजे या सर्व लोकांच्या मनात गजानन महाराजांविषयी श्रध्दा आणि प्रेम जागृत होणार हे ठललेलं आहे.
नवजात बालकाच्या गालाला खळी पडते का? हे लगेच कसं लक्षात येणार? त्यासाठी मधे काही दिवस जावे लागले. एक दिवस आम्हाला जाणवलं की अरे व्वा गालाला खळी आहे . ज्यांनी ज्यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष प्रार्थना ऐकली होती. निःसंदिग्धपणे प्रत्येकाच्या मनात महाराजांविषयी श्रध्दा वाढीस लागली.
आता ' प्रथम ' मोठा झाला. त्या गोष्टीला खूप वर्षांचा काळ लोटला पण मला आठवतं तेव्हा त्याला पाहून जो तो म्हणत होता. विशाखा कमाल आहे बुवा गजानन महाराजांची! ऐकली त्यांनी तुझी प्रार्थना आणि त्यांच्या त्या म्हणण्याला मी विनम्रपणे हात जोडून मी उत्तर देत होते.. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ विशाखा विजय गोखले
भाईंदर, मुंबई
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
*भाग एक* यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास
*भाग दोन* यात एकूण बावन्न अनुभव आहेत ( ५३ ते १०४) फक्त रुपये पन्नास.
...........................................
...........................................
*समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना*
शांतीरस आणि भक्तीरसपूर्ण मनःशांती प्रदान करून गजानन महाराजांची भक्ती प्रदान करणारी उपासना. ऐका आणि सोबत स्वतः म्हणा. संध्याकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी ही उपासना सुरू आहे. गुरुवारी आणि एकादशी ला तर मोठीच पर्वणी.
ऐका ... उपासना लिंक... https://youtu.be/WxKZ91xsve8
...........................................
जय गजानन श्री गजानन !!
जय गजानन श्री गजानन !!
जय गजानन श्री गजानन !!
जय गजानन श्री गजानन !!
जय गजानन श्री गजानन !!
श्री गजानन महाराज की जय !!