top of page

अनुभव १४२


" श्री "

गजानन महाराज की जय ! (🌺अनुभव १४२)

सद्गुरू कृपा करतीलच


जय गजानन! पंचवीस वर्षांपूर्वी माझं लग्न झालं आणि मी ग्वाल्हेरची दिक्षा खेडकर झाले इंदोरची सौ दिक्षा प्रविण शिरभावीकर. नवीन संसारात रमले आणि आईने लग्नाच्या वेळी हातात पोथी देऊन सांगितलं होतं ' दिक्षा गजानन विजय पोथी नियमित वाचीत जा ' तो सल्ला हळू हळू विस्मरणात गेला. नाही म्हणायला दोन्ही मुली पोटात असताना नियमितपणे रोज एक अध्याय वाचला हे खरंय त्याचप्रमाणे हेही खरं आहे की मिस्टर बॅन्केत असल्याने वेगवेगळ्या गावी बदलीच्या निमित्ताने राहणं झालं व त्या त्या गावची गजानन महाराजांची मंदिरं मात्र पाहणं झालं. मात्र प्रामाणिकपणे सांगायचं तर म्हणावं असं महाराजांचं करणं काही जमलं नाही.

मी पुन्हा महाराजांची भक्ती करावी आणि त्यांनी माझ्या मनाला प्रसन्नता द्यावी असा योग असावा, कारण चातुर्मास नाम जप साधनेचं माझ्या कानावर आलं, इतकंच नाही तर माझ्या हाती नामजप नोंदणीचे दोन फाॅर्म आलेत. मी आणि सासूबाईंनी ' गणी गण गणांत बोते ' नाम जप केला. तो जप चातुर्मास समाप्तीवर फाॅर्म मधील प्रार्थनेसह आम्ही महाराजांच्या चरणी समर्पितही केला. चार महिने जप केला, परिणामी मनात पुन्हा महाराजांचे विचार घर करू लागलेत. पुन्हा रोज एक गजानन विजयचा अध्याय वाचन सुरू झाले. माझ्या मनात नेहमी यायचं की आपल्याला महाराज कधी स्वप्नात दिसले नाहीत, तर एक दिवस माझी तीही इच्छा पूर्ण झाली. एके रात्री मला स्वप्नात दिसलं, एका घरासमोर बरीच मोठी मोकळी जागा आहे. त्या मोकळ्या जागेत बरेच लोक उभे आहेत. मीही तिथे उभी आहे. त्या घरातून एक सत्पुरुष बाहेर निघाले. त्यांच्या मागे काही लोक चालत होते. ते सर्व चालत चालत समोर आले व आमच्या समोरून पुढे निघाले. माझ्याकडे त्यांनी पाहिले देखील नाही. मी खूप नर्व्हस झाले. मनातून गजानन महाराजांना म्हणाले ' महाराज हे काय हो? असं काय? माझ्या नशिबात दर्शनाचा योग नाही कां ? माझ्या मनात असं आलं आणि अचानक ते सत्पुरुष मागे वळले, चालत माझ्या दिशेने समोर आले. मी विनम्रपणे मान झुकवून त्यांना नमस्कार केला, त्यांनी आशिर्वाद देण्यासाठी उजवा हात वर उचलला, बस्स! तिथेच ते स्वप्न संपलं. मला जाग आली. जागी झाले आणि एक वाक्य जे कदाचित पूर्वी कुठे वाचलं असेल की काय आठवत नाही पण माझ्या नजरेसमोर दिसल्याचं जाणवलं. ' परमार्थात कळीचा मुद्दा म्हणजे, सद्गुरूंना कळकळीने साद घाला व थोडी कळ सोसा. सद्गुरू कृपा करतीलच!' असो ते वाक्य आठवलं, तो दिवस त्या आठवणीत छान पार पडला. ते स्वप्न पुढे मनात खोलवर शिरून विस्मरणात गेलं.

स्वप्न विस्मरणात गेलं मात्र त्यातून मनाला एक चैतन्य प्राप्त होऊन महाराजांची पारायणं पुन्हा सुरू झालीत. मला आठवतं, आम्ही छत्तिसगढ रायपूर येथे चौबे काॅलनीत राहत होतो. तिथे तात्यापारात गजानन महाराजांचं छान मंदिर आहे. मंदिर बरेच वर्ष जुनं आहे .तिथे महाराजांची चिलीम हाती असलेली चांगली पाच सहा फुटी मूर्ती आहे. छान मंदिर आहे. माझं सात दिवसाचं गजानन विजय पारायण संपलं. आमच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की त्या मंदिरात पूर्ण वडा - पुरणाच्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा. त्या प्रमाणे मिस्टर तिथे भेटले. तिथे सकाळ संध्याकाळ गुरूजी सोवळे नेसून पूजा करतात. ते म्हणाले ठीक आहे सकाळी सर्व पदार्थ घेऊन या. ताटात सर्व वाढून आपण महाराजांसमोर ठेवू. नेमकी तारीख आठवत नाही पण डिसेंबर, जानेवारी मधील कुठला दिवस असावा. आम्ही सर्व तयारीनिशी मंदिरात पोहोचलो. मी सर्व ताट व्यवस्थित वाढून महाराजांना नैवेद्य दाखविला.आम्ही चौघं आणि सासू सासरे बराच वेळ प्रार्थनापूर्वक महाराजांसमोर बसलो. महाराजांना प्रसाद ग्रहण करण्याविषयी मी मनात विनंती केली. तेव्हा माझ्या मनात सहज प्रश्न आला महाराज हे तुम्हाला पावलं नं? तसा प्रश्न मी पुजारी बुवांनाही विचारला त्यावर ते म्हणाले , मी एक सामान्य माणूस. मी काय बरं सांगणार! पण मनाच्या आतून एक वाटतंय, ते सांगतो. तुम्ही यातला काही भाग मंदिराबाहेर घेऊन जा. एखादी गाय किंवा कुत्रं दिसलं तर त्यांना द्या. काळं कुत्रं असेल तर फार छान. यावर आमचे बाबा मला म्हणाले, दिक्षा मला दे मी बाहेर जाऊन बघून येतो. बाबा बाहेर गेलेत. आजूबाजूला गल्लीबोळातून पाच सात मिनिटे फिरून आलेत. पण त्यांना गाय, कुत्रं तर असू देत पण कुठलाही प्राणी बरेच अंतरापर्यंत आढळला नाही अन् ते परत फिरलेत.

बाबांना तसंच माघारी फिरलेलं पाहून माझं मन खिन्न झालं. मी खूप नर्व्हस झाले. मनातून गजानन महाराजांना म्हणाले ' महाराज हे काय हो? मी तयार केलेला प्रसाद तुम्हाला भावला नाही का? असं माझ्या मनात आलं, मात्र लगेचच मला त्या दिवशी आठवलेल्या ओळी स्मरणात आल्या. ' सद्गुरूंना कळकळीने साद घाला, थोडी कळ सोसा सद्गुरू कृपा करतीलच!' मी लगेच महाराजांना कळवळून प्रार्थना केली आणि आमच्या बाबांना म्हटलं, बाबा द्या तो प्रसादाचा भाग माझ्याकडे.मी एकदा पाहून येते. त्यावर बाबा स्वाभाविकपणेच थोडं नाराज होऊन म्हणाले, अगं मी आताच पाहून आलो नं? मी म्हटलं पाहू तर खरं. तेव्हढंच मनाचं समाधान! मी प्रसाद घेऊन मंदिराच्या बाहेर आले, आठ दहा पावलं अजून समोर आले आणि सहज आजूबाजूला नजर फिरवली. माझ्या अंगावर सरसरून काटा आला, साधारण शंभर फूट अंतरावर एक गाय अन् एक काळं कुत्रं माझ्या नजरेसमोर,माझ्याकडे पहात ऊभे होते. वास्तविक अनोळखी जनावरांसमोर जाण्याची कुणाही माणसाला भिती वाटते, पण त्या दिवशी माझ्या मनाला भितीचा स्पर्शही झाला नाही. डबडबलेल्या डोळ्यांनी मी पुढे केलेला नैवेद्य त्या दोघांनीही स्वीकारला. मी धन्य झाले.

मी माघारी मंदिरात परत आले. आम्हा सर्वांसाठीच तो एक वेगळाच अनुभव होता. मी आभार व्यक्त करण्यासाठी मूर्ती समोर हात जोडून उभी राहिले. माझ्यासह आम्ही सर्वांनीच हात जोडले. अंतर्यामी सर्वच महाराजांचं नामस्मरण करीत होते. मीही अश्रुपूर्ण लोचनांनी महाराजांकडे पाहिलं आणि आपोआप माझ्या ओठांवर शब्द आलेत. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

🌺अनुभव-- सौ. दिक्षा प्रवीण शिरभावीकर

बोरीवली, मुंबई

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजाननमहाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा श्री गजानन अनुभव पुस्तक भाग एक व भाग दोन(भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास) भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत ५३ ते १०४)फक्त रुपये पन्नास

..........................................

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

1 Comment


vasudeo kelkar
vasudeo kelkar
Jan 13, 2022

फार छान ... भावे भेटतो उमापती .... हे

Like

9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page