अनुभव १४३
- Jayant Velankar
- Oct 17, 2021
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४३)
वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन
जय गजानन! श्रीगजानन विजयचं पारायण माझ्यासाठी नित्याची बाब असली तरी २०१८ च्या सुमारास अध्याय विसावा वाचायला घेतला की त्यातील दोन चार ओव्या मला अस्वस्थ करीत होत्या. ' कन्या रामचंद्र पाटलाची , चंद्रभागा नावाची... ही असता गरोदर, प्रसंग आला दुर्धर, प्रसुतीची वेळ फार, कठीण स्त्री जातीला. ' माझ्या अस्वस्थतेचं कारणही तसंच होतं. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे गुडन्यूज असताना एके दिवशी अचानक पायरीवरून उतरताना पाय अडखळून घसरल्याचं निमित्त झालं, परिणामी मिसकॅरेज होऊन डाॅक्टरांनी शंका व्यक्त केली की ' आता बाळ होण्याच्या शक्यतेवर प्रश्न चिन्ह असू शकतं .' त्या घटनेमुळे आम्ही सर्वच खूप हादरून गेलो. मनाच्या त्या हादरलेल्या अवस्थेत मी बोलून बसले
' महाराज आता पोथी वाचन तर नित्य होणारच. पण दर्शनाला येईन तर बाळाला घेऊनच.' माझी पारायणं सुरू झालीत. संकल्पपूर्वक पारायणं, दृढतर अशा विश्वासानं पारायणं !' हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिलेले फळ देईल जाणी, दृढतर विश्वास असल्या मनी. हे मात्र विसरू नका. '
ही खूणगाठ मनाशी बांधून मी पारायणं केलीत. खरं तर आपण कोण करणार? महाराजांनी ती माझ्या कडून करवून घेतलीत. त्याचं फळही मला प्राप्त झालं. यावेळी मी ज्यांच्याकडे नाव रजिस्टर्ड केलं त्या डाॅक्टरही गजानन महाराजांच्या भक्त निघाल्यात. नऊ महिने पूर्ण भरत आले. तो फेब्रुवारी महिना होता. डाॅक्टरांनी सिझेरियनच्या दिलेल्या दोन तारखा प्रकृतीमुळे टळल्या. मी डाॅक्टरांना तीन दिवसीय पारायणाची अनुमती मागितली. पूर्ण दिवस भरले आहेत आणि मी पारायण करते आहे. प्रकट दिनाला माझं तीन दिवसीय पारायण संपलं. मी अंगारा लावून महाराजांना नमस्कार केला. योगायोगाने नागलवाडी मंदिरातून प्रकट दिनाचा प्रसाद मला प्राप्त झाला. मी दवाखान्यात दाखल झाले. गजानन महाराजांच्या आशिर्वादाने मला पुत्ररत्न प्राप्ती झाली. आमचं जीवन गजाननमय होऊन गेलं.
शरीराच्या आणि मनाच्याही एवढ्या अवघडलेल्या अवस्थेत मी गजानन महाराजांचं स्मरण करावं, याचं कारण आतापर्यंत जीवनात मला त्यांचा आधार फार मोठा वाटला. मी सहावीत असतानाच बाबा गेले आणि दहावीत असतांना आईही गेली. रेखा वैद्य माझी मावशी. तिच्याकडे गजानन महाराज प्रकट दिन ती करीत असते.प्रत्यक्ष त्या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात. म्हणून आदलेदिवशी मावशीकडे सहा सातशे भक्त गणांच्या उपस्थितीत महाराजांचा प्रकट दिन साजरा होतो. मला महाराजांविषयी समजायला मावशीच माध्यम ठरली. अर्थात महाराजांनी वेळोवेळी प्रचितीही नक्कीच दिली.
मला आठवतं इ.स.२०१५ ची गोष्ट आहे. तेव्हा मी सेकंड इअरला होते. फायनल ऐक्झॅमचे प्रॅक्टीकल्स होते.
शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं, केमिकल्स घातक आहेत. जपून रहा. आम्ही प्रयोग करीत होतो. त्या दिवशी अपघाताचा योग असावा. माझ्या शेजारी असलेल्या मुलीकडून, चुकून म्हणा किंवा काही कारणाने म्हणा. एक रसायन माझ्या डाव्या हातावर, मनगटापासून वर मध्य भागावर सांडलं. मी जोरात किंचाळले. हाताला असह्य वेदना होऊ लागल्यात. तिथे हजर असलेले सर्व माझ्या भोवती गोळा झाले. साधारण प्रथमोपचार करून आम्ही डाॅक्टरांकडे गेलो. तो होळीचा दिवस होता. आम्ही त्याच दिवशी शेगांवला जाणार होतो. डाॅक्टरांनी तपासून एक मलम लावायला दिलं. मात्र धोका टळला नाही. हाडा पर्यंत जखम असल्यास ऑपरेशन देखील करावं लागेल, मात्र हा निर्णय आपण एक दिवसानी घेऊ शकतो. तसही उद्या धुळवडीमुळे सर्व बंद असणार. तेव्हा परवा बघू असं सांगितलं. मी शेगांवला जाण्याची इच्छा आणि अनुमती दोन्हीसाठी डाॅक्टरांना बोलले. त्यांनी अनुमती दिली आणि आम्ही शेगांवसाठी रवाना झालो. हात दुखत होता पण, माझा डाॅक्टर आसनावरी बसला आहे. त्याजकडे मजला न्यावे. अशी ओढ या कल्याणी मोहरील च्या मनाला लागली होती. महाराज मी येते आहे. काय होईल ते होऊ दे. पण ऑपरेशन टळू द्या. या वेदना असह्य आहेत हो, त्या कमी कमी होऊ द्यात. असा सतत धावा मनात सुरू होता. आम्ही शेगांवला पोहोचलो. होळीच्या दिवशी गर्दी कमी होती, वाटलं उद्याही असंच राहील. दुसरे दिवशी हात दुखत असूनही मी आंघोळ केली. शुचिर्भूत होऊनच दर्शनाला जाण्याची ओढ होती. त्या दिवशी दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. दर्शन बारीमधे आम्ही दोन ते अडीच तास आम्ही उभे होतो. मी सोबत गजानन विजय पोथी, छोट्या आकारात जी मागे संस्थानने छापली होती ती माझ्या जवळ घेतली होती. माझे पाच सहा अध्याय वाचून झालेत हात ठणकतच होता. कदाचित महाराज परिक्षा पाहत होते. गाभारा जवळ आला. एका बाईच्या कडेवर तान्ह मूल होतं, ते खूप मोठ मोठ्यानं रडत होतं. प्रथम ते दूर होतं पण गाभार्यात आम्ही वळलो तो ती बाई माझ्या जवळ आली. आता आम्ही महाराजांसमोर उभे होतो ती बाई अगदीच माझ्या बाजूला होती. मी पोथी आत ठेऊन महाराजांना नमस्कार केला तेव्हा माझा डावा हात वर आला आणि काही कळायच्या आत क्षणात त्या मुलाचा हात हाताला बांधलेल्या पट्टीवर पडला. त्याने ती जागा दाबून धरली. मी कळवळून ओरडले महाराज सोडवा. आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहू लागले मी नमस्कार करून रडतच बाहेर पडले. सोबतचे लोक म्हणू लागले त्या लहान मुलाच्या माध्यमातून महाराजांनी काही योजलं असावं. वेदना असह्य होत होत्या. आम्ही तसेच आनंद सागरला पोहोचलो. काय झालं आहे पाहू तर खरं म्हणून आम्ही पट्टी उघडली, पट्टी बाजूला केली तेव्हा त्या पट्टीला चिकटून त्या जखमेवरचा एक लेअर बाजूला झाला. साल निघाल्या सारखा तो भाग दिसत होता. पण एकदमच कोरडा. माझं दुखणं पूर्णपणे थांबलं होतं. मी मनोमन महाराजांना हात जोडले. शेगांवहून माघारी फिरलो. डाॅक्टरांना दुसरे दिवशी जखम दाखवली. त्या म्हणाल्या इतक्या आश्चर्यकारक रितीने सर्व झालं आहे की, यू आर परफेक्टली ऑलराईट. थोडा खोबरेल तेलाचा हात फिरवा ठीक होईल. मी घरी आले हळुवार पणे तेलाचं बोट त्या जागेवरून फिरवलं आणि सोबतच महाराजांचं स्मरण केलं. श्री गजानन !जय गजानन !श्री गजानन ! जय गजानन !
🌺अनुभव-- सौ कल्याणी राहूल धोंड
नागपूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजाननमहाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा श्री गजानन अनुभव पुस्तक भाग एक व भाग दोन(भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास) भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत ५३ ते १०४)फक्त रुपये पन्नास
अशक्य ते काय तुम्हा गजानन ?