अनुभव १४४
- Jayant Velankar
- Oct 28, 2021
- 4 min read
" श्री "
गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४४ )
सांभाळी मज अंतर्बाह्य
जय गजानन! मी डाॅ. माधुरी काटे पॅथाॅलाॅजी डिपार्टमेन्टमधे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काॅलेजमधे काम करण्याचा योग माझ्या आयुष्यात आला. भिन्न भिन्न ठिकाणी काम केल्यामुळे माणसाच्या गाठीशी अनुभवाची पुंजी जमा होत जाते असं म्हणतात, ते खरंही आहे. पण इ.स.२०१० मधे दहा महिन्यांसाठी मी नेरूळ ला डी.वाय. पाटील काॅलेजला ब्लड बॅन्क इनचार्ज म्हणून कार्य केलं, त्या काळात माझ्या गाठीशी जी पुंजी जमा झाली ती मला लाख मोलाची वाटते, किंबहुना अमूल्य आहे. कारण ती गोष्ट आहे ' गजानन महाराजांची भक्ती. '
पाटील मॅडम गजानन महाराजांच्या भक्त! त्यामुळे तिथे गजानन महाराजांचं मंदिर आहे. तेव्हा तिचे महाराजांची पालखी यायची. ते मंदिर, ती पालखी, ते वातावरण. यामुळे गजानन महाराजांची भक्ती मनात रुजली.
भकी मनात रुजली, असं आपण सहज म्हणून जातो. पण थोडा कठीण प्रसंग आला की आपलं मन साशंक होतं. आपली तर्कदृष्टी शुन्यावर येऊन पोहोचते. २०१८ च्या सुमारास मी मान्सून ट्रॅकींगसाठी म्हणून विसापूर येथे गेले होते. तिथे तीन चार वेळा चांगली जबरदस्त पाय घसरून पडले. सावरले, पुन्हा पडले. मला चालता येईना. दोन बाजूला दोन सहकारी होते तेव्हा त्यांच्या आधाराने चालणे शक्य झाले. नी इंज्युरी झाली. आता मधून मधून पाय दुखतो पण थोडक्यात निभावले. माझ्या मनात सुरू झाले, महाराज मी अशी कशी पडले? त्यावर माझ्या डाॅक्टर सहकार्यानी समजावलं. 'अगं त्यांनी तुला वाचवलं.' कल्पना करून बघ. तुला फ्रॅक्चर होऊ शकत होतं. गंभीर नी इंज्युरी होऊ शकत होती. पायाचे लिगॅमेन्ट्स फाटू शकत होते. तसं झालं असतं तर तुझ्या हालचालींवर किती नियंत्रण आलं असतं! पण विचार कर, तू तुझा ठरलेला जुलै महिन्यातील युरोप टूर पण करू शकली. हे ऐकलं तेव्हा मनाला पटलं आणि पुढे महाराजांनी एका प्रसंगात त्याचं उत्तरही दिलं.
१७ डिसेंबर २०१८ चा तो चित्तथरारक प्रसंग. आजही आठवला तर मनाचा थरकांप उठतो. तेव्हा मी इ.एस.आय.सी. पोस्ट ग्रॅज्युएट मेडीकल काॅलेज. अंधेरी येथे कार्यरत होते. ती पाच मजली इमारत. आमच्या डीनचं ऑफिस पाचव्या मजल्यावर होतं. अर्धवट बांधकाम झालं आहे. व्यवस्थापनाचा एकंदरीत अभाव आहे. इकडे तिकडे काही सामान पडलं आहे. साडेतीनशे बेड्सचं हाॅस्पिटल तिथे आहे. इमारतीत कुठे प्रसन्नता वाटावी अशी काही फारशी लक्षणं नाहीत. अशा टिपीकल वातावरणाची सवय झालेली ती इमारत! माझ्या ब्लड बॅन्क मधे शाॅर्ट सर्किट मुळे एक दोन लहान आग लागल्याचे प्रसंग घडून गेले होते. तिथे एकूण तीन लिफ्ट, पण त्या एकदम कधीच सुरू नसणार. त्यामुळे लिफ्टच्या दाराशी नेहमी गर्दी. त्या दिवशी दुपारी चार वाजता माझं काम संपलं. डीनच्या ऑफिस मधे बायोमेट्रिक उपस्थिती लावून मी निघाले. माझ्या कानावर खाली कुठे काही गोंधळ झाल्यासारखा आवाज आला. खूप जुनी इमारत आणि नेहमीचेच इमारत देखभाल विषयक गोंधळ. त्यामुळे असेल काही तरी नेहमीचाच गोंधळ. त्याचीच ही आरडाओरड. असं वाटून मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मी समोर निघाले तर दोन लिफ्ट बंद होत्या, एका भिंती आड तिसरी लिफ्ट, मी तिकडे गेले. लिफ्ट वर होतीच. दार उघडलं, आश्चर्य म्हणजे लिफ्ट पूर्ण रिकामी. त्या लिफ्ट मधे नेहमी फुडची ट्राॅली असायची, तीही तिथे नव्हती. मी आत शिरले .मी पाऊल आत ठेवलं अन् माझ्या कानावर स्पष्ट आवाज आला. ' किती वेळा मी धावून यायचं? काय करते आहेस? जाऊ नको!' तो आवाज स्पष्टपणे मला जाणवला. मला जाणीव झाली ' जाऊ नकोस !' हे आज्ञार्थी वाक्य आहे. माझ्या मनाने ती आज्ञा ऐकली. मी लगेच माघारी फिरले. ते दहा सेकंद, ती आज्ञा आणि नकळत घेतलेला तो निर्णय. हे सगळं माझ्या आयुष्यासाठी फार महत्वाचं ठरलं.
मी माघारी फिरून ऑफीसात डोकावले तो मला जबर धक्का बसला. ए सी च्या एका डक्ट मधून खूप मोठा धूर आत शिरून काळोख पसरत होता. मी जिन्याकडे वळले .जिन्याने खाली उतरण्याचा निर्णय घेतला. जिन्याची ही बाजू आगीच्या बाजूला नव्हती. मी खाली उतरू लागले. लिफ्टच्या बाजूला पूर्ण धूर पसरलेला मी पाहिला. तो पूर्ण भाग एव्हाना धुरात लपेटल्या गेला होता. इमारतीतील जोरजोरात ओरडण्याचे आवाज वाढले होते. हाॅस्पिटल, बाकी इमारत, लिफ्ट सर्वत्र धूर शिरला होता. लोक जिवाच्या आकांतानी ओरडत होते. खाली उतरण्याच्या नादात मी पूर्ण खाली तळघरापर्यंत खाली उतरले. तो भाग अगदी निर्मनुष्य होता. हेड ऑफ दि डिपार्टमेन्ट म्हणून मी पहिल्या मजल्यावर पाहिलं तेव्हा सर्व लोक घाईने बाहेर पडताना मला दिसले.
इमारतीत खाली असलेल्या प्लॅस्टिकच्या सामानाला आग लागून ती आग आणि तो धूर इतरत्र पसरला होता. एसी डक्ट मधून तो धूर इमारतीत शिरला होता. त्या धुरामुळे सफोकेशन होऊन अनेकांना त्रास झाला. अग्नी शामक दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या होत्या. मनाचा धीर सुटल्यामुळे पेशंट, नातेवाईक, कर्मचारी सर्वांची जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. त्यात छोटे मोठे अनेक अपघात झालेत. जीव गुदमरून काही लोक मृत्युमुखी पडले. जिन्याने बाहेर पडल्यामुळे मी सुखरूप बाहेर पोहोचले होते. मी इमारतीकडे नजर टाकली, संपूर्ण इमारत धुराची काजळी अन् जीवाची काळजी यामुळे झाकाळून गेली होती. एका विचाराने माझ्या जीवाचा थरकाप झाला. ' मी जर लिफ्टमधे असते तर? ' त्या भागातील वीज पुरवठा सुरक्षा म्हणून लगेच बंद करण्यात आला होता. मला लिफ्ट मधे शिरताना कुणीही पाहिलं नव्हतं. असा विचार मनात आला पण दुसरेच क्षणी आतून जाणीव झाली, कुणीही न पाहू दे, पण त्यानं पाहिलं होतं. ते स्थिर चर व्यापून उरलेलं तत्व! ट्रॅकींगच्या वेळी तू पडलीस तेव्हा तेच तुझ्या सोबत होतं आणि लिफ्टमधे शिरत होतीस तेव्हाही तेच सोबत होतं. या विचाराने मन थोडं स्थिरावलं, अन् पावलं घरी जाण्यासाठी वळलीत आणि कृतज्ञतेने मनात जप सुरू झाला. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन !
🌺अनुभव-- डाॅ. माधुरी काटे, कांजूर मार्ग, मुंबई
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजाननमहाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा श्री गजानन अनुभव पुस्तक भाग एक व भाग दोन(भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास) भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत ५३ ते १०४)फक्त रुपये पन्नास
................................
Comments