अनुभव १४५
- Jayant Velankar
- Nov 25, 2021
- 4 min read
" श्री "
गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४५)
विलक्षणच आहेत माझे गजानन महाराज
जय गजानन! गजानन महाराज स्वप्नात येतात. भविष्यात येणार असलेल्या संकटाची जाणीव करून देतात. स्वप्नात येण्यासाठी तोच दिवस निवडतात. एकदा ते होऊन गेलेल्या घटनेविषयी, मात्र जी घटना मला अजिबात ठाऊक नाही त्या विषयी स्वप्नात जाणीव करून देतात. तर एकदा भविष्यात घडणार असलेल्या घटने विषयी स्वप्नात संकेत देतात. त्यांनी स्वप्नात सांगितलेलं प्रत्यक्षात घडून येतं. हे माझ्या बाबतीत घडलं. सगळंच कसं विलक्षण आहे नं? माझ्यासाठी तरी माझे गजानन महाराज विलक्षण आहेत. विलक्षणच आहेत माझे गजानन महाराज!
मी सौ अनिता गजानन शिंदे. परभणी येथे वास्तव्यास असते. माझे मिस्टर बी. ए. एम. एस. डाॅक्टर आहेत. त्यांचा एक लहान दवाखाना आहे. आमचं लग्न इ.स.२००१ मधे झालं आणि आम्ही इ.स.२००४ मधे शेगांव दर्शनासाठी गेलो. तेच माझं पहिलं शेगांव दर्शन!
म्हणजे वास्तविक माझ्या मिस्टरांकडे आणि विशेष करून आमच्या सासर्यांना गजानन बाबांचे खूप प्रेम. तिथून ते माझ्याकडे आलं. आमच्या बाबांचे एक देशमुख म्हणून मित्र आहेत ते आणि बाबा असे मिळून आम्ही इ.स.२००५ पासून गजानन महाराज प्रकटदिन साजरा करीत आहोत. माझे मिस्टर तर दर दिवाळीला आधी शेगांवला गजानन महाराजांचं दर्शन घेतात मगच आमची दिवाळी साजरी होते. गजानन महाराजांचा नामजप वहीत लिहिणे हा त्यांचा नित्यनेम आहे. सासरे बुवांच्या आग्रहावरून माझ्या दोन्ही मुलांची जावळं आम्ही श्रीक्षेत्र शेगांवलाच काढलीत.
तात्पर्य मिस्टरांना गजानन महाराजांचं खूप प्रेम आहे. त्यांची भक्ती आहे .परंतु त्यांच्याशी आणि माझ्याशी संबंधित अनुभव माझ्या माध्यमातून गजानन महाराजांनी आम्हाला सांगितला, हे माझं महत् भाग्य!
मला आठवतं, १८ फेब्रुवारी २०१७ शनिवार रोजी आमच्याकडे, महाराजांचा प्रकट दिन होता. खूप भक्तगण आले होते. प्रकटदिन थाटात पार पडला. संध्याकाळ झाली , प्रसाद घेऊन सर्व आपापल्या घरी परतले. संध्याकाळचे पाच वाजले होते. नित्याप्रमाणे मिस्टर दवाखान्यात गेले. दवाखाना आटोपून नेहमीप्रमाणे साडे नऊच्या सुमारास घरी परतले. दिवसभर प्रकटदिनाचा कार्यक्रम छान पार पडला, आपल्याला महाराजांचा प्रसाद मिळाला या आनंदात, पुन्हा प्रसाद घेऊन आम्ही सर्व झोपी गेलो.
त्याच रात्री उशीरा ,म्हणजे १९ फेब्रुवारीच्या पहाटे मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात मला दिसलं की एक चोर माझ्याकडे आला. त्यानं मला चाकू दाखवला आणि तो माझं मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून मी दचकले, घाबरले, अन् मला जाग आली. पहाटे पडलेलं स्वप्न खरं होतं, असं म्हणतात. मुळात अस्वस्थ करणारं स्वप्न आणि पहाटेची वेळ, त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले. स्वप्नाचा विचार काही केल्या मनातून जाईना. मनात एकच प्रश्न. असं स्वप्न का पडावं? अशात आता चांगलं उजाडलं, सगळे व्यवहार सुरू झाले. सकाळी उशीरा मिस्टर आम्हाला सांगत होते. ' काल रात्री आठच्या सुमारास, वेशभूषेवरून गुंड आणि मवाली वाटणारा एक माणूस दवाखान्यात आला. त्याच्या हाताला भरपूर मार लागला होता. जखमेचं एकंदर स्वरूप पाहून मी त्याला एखाद्या मोठ्या दवाखान्यात किंवा सरकारी इस्पितळात जाण्याचा सल्ला दिला. त्यावरून तो रागावला, रागाच्या भरात त्याने मोठा चाकू काढला. मला म्हणाला उपचार नाही केला तर माझ्याशी गांठ आहे. ते सर्व पाहून, मी घाबरून जोरात ओरडलो. तेव्हा बाजूच्या मेडीकल शाॅपमधून माणूस धावत दवाखान्यात आला आणि मी कसाबसा वाचलो. काल रात्री सांगितलं असतं तर तुमची रात्र काळजीत गेली असती, म्हणून मी काल काही बोललो नाही.
ते ऐकलं आणि मनात माझ्या स्वप्नाचा उलगडा मला झाला. मिस्टर काही बोलले नाही तरी, स्वप्नातून मला सूचना प्राप्त झाली होती. मी घाईनेच गजानन महाराजांकडे जाऊन फोटोला हात जोडले व महाराज आमचं रक्षण तुम्हीच करणार अशी प्रार्थना केली.
त्यादिवशी तर तो माणूस गेला पण काही दिवसांनी पुन्हा परत दवाखान्यात आला. डाॅक्टरांना वेडंवाकडं बोलला, चालता झाला. पुन्हा काही दिवसांनी तेच. आमच्या डोक्यावर नसतं टेन्शन वाढू लागलं. भलती काळजी मागे लागली. मी गजानन बाबांना हात जोडले. म्हटलं महाराज सज्जनांचा वाली कोण? तुम्हीच आमचे रक्षणकर्ते! रक्षण करा! मधे काही काळ गेला. काही महिन्यानंतर पुन्हा आला. यावेळी मी महाराजांना म्हटलं, महाराज ही केस तुमच्यावर सोपवते आहे. आम्हा सर्व कुटुंबियांनी पण महाराजांना प्रार्थना केली. आम्ही म्हटलं महाराज आता प्रकटदिन जवळ आला आहे. तो शांतपणे पार पडू द्या. आम्हा भक्तांची काळजी तुम्हाला.
इ.स.२०१८ चा तो प्रकटदिन! त्या दिवशी महाराजांच्या कृपेने मस्त कार्यक्रम झाला. भजनाचा कार्यक्रम तर खूपच रंगला. भजनानंतर आम्ही उभयतांनी महाराजांची आरती केली. त्यावर्षी उपस्थितांची संख्या बरीच मोठी होती. संपूर्ण वातावरण गजाननमय होतं. महाराजांपर्यंत आमची प्रार्थना पोहोचली होती. नुसतीच पोहोचली नाही तर महाराजांकडून पुढे पोहोच पावतीही मिळाली. महाराजांचा प्रसाद घेऊन अवघे लोक तृप्त झालेत. आम्हीही त्या भक्तीमय वातावरणात सुखावलो.
रात्र झाली. रात्री उशीरा म्हणजे दुसरे दिवशी पहाटे त्याच मुहूर्तावर मला पुन्हा तेच स्वप्न पडलं.
स्वप्न तेच पण यावेळी थोडा फरक होता. नक्की कुठे ते आठवत नाही पण मी मंदिरात होते. चोर आला, त्याने चाकू दाखवून माझ्या मंगळसूत्राला हात घातला. इतक्यात शेगांवला पारायण सभागृहात जो महाराजांचा प्रसिद्ध फोटो आहे त्या रुपात प्रत्यक्ष महाराज आलेत, त्यांनी झटक्यात चोराचा हात बाजूला केला आणि मला जाग आली. यावेळी मी अत्यंत समाधानाने उठले. कारण मला स्पष्ट संकेत मिळाला होता की महाराजांनी स्वतः माझ्या मिस्टरांचे रक्षण केले आहे. ती गुरुवारची पहाट होती. तो गुरुवार, ते दर्शन! मी धन्य झाले.
त्यानंतर दहा पंधरा दिवसांतच वृत्तपत्रात त्या माणसा विषयी ठळक मथळ्यात एक बातमी आली. महिलेचे अपहरण केल्या मुळे एका कुप्रसिध्द चोरास अटक.
महाराजांनी आम्हाला चिंतामुक्त केलं होतं. बातमीवरुन जाणवलं की तो अट्टल गुन्हेगार होता. म्हणजेच आमच्या कल्पनेपेक्षा संकट फार मोठं होतं पण अर्थातच महाराजांच्या आधारापुढे ते काहीच नव्हतं. कारण महाराजांनीच आपल्याला सांगितलं आहे नं की ' मी गेलो ऐसे मानू नका ' मग आम्ही का चिंता करावी? आम्ही फक्त त्यांचं स्मरण करून म्हणावं श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ अनिता गजानन शिंदे
परभणी
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
अवश्य वाचा श्री गजानन अनुभव पुस्तक भाग एक व भाग दोन( भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास) भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत ५३ ते १०४)फक्त रुपये पन्नास.
...........................................
जय गजानन
देवा गजानन स्वामी मलाही अशी आर्तता मिळू दे, अशी तळमळ दे जेणे करू तुमची सेवा व तुमचे दर्शन होऊ दे.
श्री गजानन महाराज की जय
गण गण गणात