आम्ही आमचा अनुभव लोकांना का सांगावा?
- Jayant Velankar
- Oct 21, 2021
- 3 min read
"श्री "
गजानन महाराज की जय!🌺
आम्ही आमचा अनुभव लोकांना का सांगावा?
🙏जय गजानन! आज आपल्याला महाराजांचा अनुभव वाचायचा नसून अनुभव सांगण्याविषयी लोकांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर प्रकाश टाकायचा आहे. गजानन महाराजांच्या कृपेने आजपर्यंत दीडशे विविध अनुभव लोकांपर्यंत पोहोचले. त्यातून भक्तांना एक आनंद प्राप्त झाला. या काळात अनेक भक्तांनी त्यांना आलेले अनुभव कळवून सहकार्य केलं म्हणून हे शक्य झालं. पण त्याच वेळी अनेक भक्तांनी एक प्रश्न उपस्थित केला. आपण अनुभव शेअर करावा का? आम्ही आमचा अनुभव लोकांना का सांगावा?
परमार्थात आपण एखादी कृती करतो तेव्हा ते कार्य करण्यामागील 'उद्देश ' काय हे महत्वाचं ठरत असतं. परमार्थात अहंकाराला जागा नाही. अहंकाराने केलेले कृत्य हे पारमार्थिक ठरत नाही. आपण आपला अनुभव सांगत असताना, त्यामामागे ' आत्मप्रौढी 'हा हेतू असेल तर ते गैर आहे. त्यामुळे स्वतःचं मोठेपण सांगण्यासाठी अनुभव सांगणे नकोच.
अनुभव सांगण्यामागे आपल्या सद्गुरूंची महती वर्णन करणं हाही उद्देश असू शकतो. सद्गुरूंनी आपलं भलं केलं. आपलं भलं झालं तसं इतरांचही व्हावं असा उदात्त हेतू असेल तर अनुभव कथन केव्हाही योग्यच ठरेल. आपण सर्वसामान्य भाविक! आपण आपल्या मनाला प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारून पहावा, तो असा की, जर लोकांनी अनुभव सांगितले नसते तर श्रीगजानन विजय ग्र॔थ निर्मिती झाली असती का? ज्या गजानन विजय ग्रंथाच्या सहाय्याने आपली महाराजांच्या दिशेने होणारी वाटचाल सोपी झाली त्या ग्रंथात प्रामुख्याने अनुभवच तर आहेत.
आपल्या सद्गुरूं विषयीचे अनुभव सांगणं, त्यांच्याशी संबंधित गोष्टीं सांगणं आणि ऐकणं म्हणजे आपल्या दैवताची स्तुती करणं आहे!ती श्रवण भक्ती आहे. त्यातून देवता प्रसन्न होतेच होते. दासगणू महाराजांनी गजानन महाराजांना म्हटलं आहे. ' मी तुझा झालो भाट , मार्ग दावी मला नीट. ' अर्थात ते महाराजांची स्तुती करताहेत आणि त्यांना आशिर्वाद मागताहेत. दासगणूंना आशिर्वाद प्राप्त झाल्याचं आपण सर्व पाहतोच आहे.
अनुभव कथनाच्या संदर्भात गजानन विजय पोथीतील एक दाखला लक्षात घेण्यासारखा आहे. बाळापूर तालुक्यातील मोरगाव येथे मारुतीपंतांनी त्यांच्या शेतात राखण करण्यासाठी एक तिमाजी नामक नोकर ठेवला होता. एकदा रात्री तिमाजीला गाढ झोप लागली, त्याचवेळी अनेक गाढवं शेतात शिरून जोंधळा खाऊ लागले. तेव्हा महाराजांनी रात्री तिमाजीला हाक मारून जागं केलं व पुढे होणारं जास्तीचं नुकसान टळलं. तिमाजीने सकाळी याविषयी मारुतीपंताला सांगितलं. मारुतीपंत लगेच शेगांवला जाणार होते त्याप्रमाणे ते शेगांवला पोहोचलेत. आता या कथेत तिमाजीला हाक मारणारे कोण होते, हे ना तिमाजीला माहीत होतं ना मारुतीपंताला .महाराजांसमोर मारुतीपंत आले तेव्हा महाराजांनी स्वतः सांगितलं ' तुम्ही झोपाळू नोकर ठेवता आणि स्वतः घरी निजता. अरे मी जाऊन तिमाजीला जागं केलं. ' अर्थात खरा सूत्रधार कोण आहे ते महाराजांनी स्वतः सांगितलं. त्याची जाणीव करून दिली. मग जर आपल्या जीवनातील कथानकात त्या ब्रह्मांड नायकाच्या अस्तित्वाची चाहूल लागली. तो खरा सूत्रधार आहे याची जाणीव आपल्याला झाली, तर तशी जाणीव अन्य भक्तांना करून देण्यात आनंदच नाही कां?
आदरणीय शिवशंकर भाऊंचं मत
इ.स. २०१८ च्या सुमारास श्री गजानन महाराजांविषयी भक्तांना आलेल्या अनुभवांचं संकलन आणि शब्दांकन सुरू झालं. प्रत्येक अनुभव लोकांना आवडून भरपूर प्रसिद्ध होत होता. अशात अनुभव क्रमांक बत्तीस. श्री जितेंद्र करमरकर यांचा प्रसिद्ध झाला. सहकारनगरच्या गजानन महाराज मंदिरात प्रत्यक्ष महाराजांनी भेट दिल्याचा अनुभव. करमरकर त्या मंदिरात पुजारी म्हणून काम पहातात. त्या अनुभवाला भक्तांकडून जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. तो अनुभव बहुश्रुत झाला. शेगांवलाही सेवेकर्यांसह सर्वत्र वाचण्यात आला. तो अनुभव प्रसिद्ध होऊन काहीच दिवस लोटले होते, तशातच करमरकरांना शेगांवला जाण्याचा योग आला. शेगांवला ते भक्त निवास क्रमांक पाचमधे काउंटरवर खोलीची चौकशी करीत होते.सेवेकर्यांच्या कानावर त्यांचं नाव पडलं, त्यांनी लगेच त्यांना विचारलं माऊली नुकताच अनुभव प्रसिद्ध झाला तेच तुम्ही का? माऊली उद्या तुम्ही येथे आहातच, तेव्हा तुम्ही उद्या सकाळी अकरा वाजता तयार रहाल तर बरे होईल. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ उद्या तुमची आणि भाऊंची भेट होईल. आदरणीय भाऊंची भेट होणार ,ही गोष्ट करमरकरांसाठी अत्यंत आनंददायी होती. भेट ठरली आणि आनंदाने करमरकर माझ्याशी बोलत होते.
हॅलो, जय गजानन सर! उद्या भाऊंच्या भेटीचा योग येतो आहे. मी शेगांवला आलो आहे. मला तर सुचेनासं झालं आहे काय बोलू. मी म्हटलं आपण काय बोलणार, तेच काय बोलतात ते शांतपणे ऐकून घ्या परत आले की मला भेटीचा वृतांत सांगा. हां एक करा आपलं बोलणं झालं आहे त्या प्रमाणे आपण आता बावन्न अनुभव असणारं श्रीगजानन अनुभव पुस्तक प्रकाशित करणार आहोत. त्यासाठी भाऊंचे आशिर्वाद मागण्यास मात्र विसरू नका. आपणा दोघांतर्फे नमस्कार करून पुस्तकासाठी आशिर्वाद अवश्य मागा.
दुसरे दिवशी ठरल्याप्रमाणे त्यांची भाऊंसोबत भेट झाली. परत आल्यावर करमरकर सांगत होते. भाऊ म्हणाले.. " काहीही झालं तरी महाराजांचे चरण सोडू नका. जे आहे ते त्यांच्या पायाशीच आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता पर्यंत चाळीस अनुभव लिहून प्रसिद्ध झाले आहेत. अहो याचा अर्थच याला महाराजांचे आशिर्वाद प्राप्त आहेत. हे त्यांच्याच आशिर्वादाने होतं आहे. तसं नसतं तर हे एक दोन अनुभवानंतर बंदच झालं असतं आणि जिथे महाराजांचं कार्य त्यांच्याच आशिर्वादाने होतं आहे तिथे अन्य कुणी काही सांगण्याची गरज नाही. करा सर्व चांगलं होईल. "
त्यावेळी चाळीसच्या घरात असणारी संख्या आता दीडशेच्या घरात पोहोचली आहे. असो महाराजांची इच्छा!
थोडक्यात काय की अनुभव कथनातून आपल्या मनात आनंदाच्या उर्मी उठत असतील, तसेच दुसर्याचंही मन आनंदित होऊन, दोघांच्याही मनात भक्तीभाव जागृत होऊन दोघांचीही पावलं महाराजांच्या दिशेने वळत असतील तर आनंदच आहे. भगवंताचे अधिष्ठान ठेवून हे झालं तर ते सर्वांसाठी भल्याचंच ठरणार आहे. बाकी काय... श्री गजानन!जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
जयंत वेलणकर नागपूर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अनुभव पाठवित असताना कृपया लक्षात घ्या..
१.. अनुभव प्रामाणिक असावा
२... त्यातील तपशील सत्य असावेत.
३... अनुभव ह्रृदयस्पर्शी असावा.
Comments