एक काळजीचा विषय 🌺
- Jayant Velankar
- Mar 24
- 2 min read
Updated: Apr 13

"श्री "
श्री गजानन महाराज भक्तांची, ऑनलाइन खोली बुकिंग करताना समाज कंटकांकडून ,खोट्या वेबसाईटच्या माध्यमातून होणारी फसवणूक, एक काळजीचा विषय
🙏सर्व गजानन महाराज भक्तांना जय गजानन!
दोन-तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट, पुण्याहून पुतण्याचा फोन आला, 'निरंजन' सांगू लागला,' काका... मी आणि बाबा आम्ही त्र्यंबकेश्वरला गजानन महाराजांच्या मठात दर्शनासाठी जाण्याचा विचार करतो आहे. तिथे जागा मिळण्याचे टेन्शन नको म्हणून ऑनलाइन खोली बुकिंग साठी मी एका वेबसाईटवर ऑनलाइन बुकिंग केलं, पण माझ्या लक्षात आलं की माझी फसवणूक झाली आहे. पाच हजार रुपये गेले. आता तिकडून सांगत आहेत की एन्ट्री परतवण्यासाठी पुन्हा दीडशे रुपये भरावे लागतील. मला संशय आला म्हणून तुला फोन केला. ' गजानन महाराज संस्थान त्र्यंबक' अशी ती साईट पाहून मनात संशयच आला नाही. त्याचं म्हणणं ऐकलं आणि माझ्या मनाने शेगांवात धाव घेतली. मला शेगावला पाहिलेला बोर्ड आठवला. तो असा, नम्र निवेदन .. www.gajananmaharaj.org हेच असून अन्य कोणतेही संकेत स्थळ नाही. श्री संस्थांंनच्या शेगांव सह सर्व शाखांमध्ये श्री दर्शन व रूम बुकिंग संबंधी कोणतीही ऑनलाइन बुकिंग करण्यात येत नाही. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर , ९८८१७५८७६२ आणि ९५२९६५८०७४ यावर संपर्क साधता येईल. (या बोर्डचा फोटो जवळ असल्यामुळे नंबर सकट माहिती शक्य आहे.) ही माहिती ऐकल्यानंतर निरंजन ने विचारलं, ठीक आहे, माझी तर फसगत झाली. पण याविषयी काही समाज जागृती करायला हवी की नाही? त्यावर म्ह

टलं, संस्थान त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे. पण हे सर्व इतकं व्यापक आहे की समाजकंटक या गोष्टीचा गैरफायदा घेण्यासाठी टपलेलेच आहेत. एक खोटी वेबसाईट लक्षात आली की लगेच तत्सम नावाची दुसरी तयार करून भक्तांना फसवण्यासाठी तत्पर असणारे दुर्जन अनेक आहेत.
एकीकडे, निरंजनच्या या म्हणण्यावर विचार करीतच होतो, तर अशीच घटना ओंकारेश्वर भक्त निवासाच्या संदर्भात घडल्याचं कानावर आलं. गोपाळ भट्टड, ब्रह्मपुरी यांना ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी जायचं मनात आलं. त्यांनी खोली बुकिंग साठी ऑनलाईन शोध घेतला, तेव्हा त्यांना एक संकेतस्थळ आढळलं. 'महाराज संस्थान ओंकारेश्वर' त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरलेत आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण फसलो. मात्र त्यांनी लगेच पाऊल उचलून आपल्या बँकेत फोन करून त्या पेमेंट वर रोख लावला. ही दोन वानगी दाखल उदाहरणे आहेत. खोलात शिरून शोध घेतला तर लक्षात येईल की, असंख्य भक्तांची आणि सज्जनांची फसवणूक होत आहे. चाणक्यासह अनेक विचारवंतांनी विचार मांडला आहे. "दुर्जनांचं दुष्कृत्य काळजी करण्यासारखं आहेच, पण सज्जनांची निष्क्रियता अधिक काळजी करण्यासारखी आहे. त्यामुळे अर्थातच यासंदर्भात भक्तांनी, सज्जनांनी सावध होणं गरजेचं आहे आणि त्याच विचाराने हे लिखाण आहे. शेगांव गजानन महाराज भक्तांपुरतं बोलायचं तर, त्यांनी शेगाव संस्थानचं संकेतस्थळ नीट लक्षात ठेवून एक खूणगाठ सध्या पक्की लक्षात ठेवावी की संस्थानच्या सर्व शाखांमध्येच रूम बुकिंग ऑनलाइन होत नाही. बाकी गजानन महाराज भक्तांना या संदर्भात सावध करण्यासाठी हा मेसेज जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येकच भक्ताची आहे.
ऑनलाइन रूम बुकिंग संदर्भात होणारी गोष्ट उद्या डोनेशनच्या बाबतीत न घडो! म्हणूनच
आणखी महत्त्वाचं असं की भक्तांनी ऑनलाइन व्यवहार करताना संबंधातील चार दोन भक्तांशी बोलून सावधपणे व्यवहार करावा. कारण एकीकडे हे भक्तांचं नुकसान तर आहेच, पण संस्थानचा पैसा संस्थानलाच मिळायला हवा हेही महत्त्वाचं आहे!


🙏जय गजानन🙏
जयंत वेलणकर नागपूर
9422108069


Comments